नागपूर : स्मार्ट सिटी, ग्रीन सिटी, टायगर कॅपिटल असे अनेक बिरुदं मिरविणारे नागपूर शहर आता ‘हॅपी सिटी’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. शहरात होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम ही नवी ओळख निर्माण करण्यास कारण ठरत असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
नागपूर महानगरपालिका आणि कलाशृंगार नृत्य निकेतनच्या वतीने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शनिवारी (ता. ९) आयोजित महापौर चषक अ.भा. नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर मनपाच्या क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, नृत्य गुरु सोनू नक्षिणे, स्पर्धेचे परिक्षक रमेश लखमापुरे, रेणू महाजन , प्रशांत कोतुरवार, प्रणाली राऊत, प्रिती पुराणिक उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने शहरात खासदार सांस्कृतिक महोत्सवासारखे उपक्रम आयोजित होतात. अशा महोत्सवामुळे नागपुरात सांस्कृतिक वातावरण तयार झाले आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहाची निर्मिती करून ना. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराला सांस्कृतिक देण दिली आहे. महापौर इनोव्हेशन अवॉर्डसारख्या उपक्रमातून नवीन काही शोधणाऱ्या नागरिकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. येथील उपक्रम आणि विकास प्रकल्पांमुळे नागपूर शहराची ओळख आता ग्लोबल सिटी म्हणून होऊ लागली आहे. प्रत्येक उपक्रमांत वाढता सहभाग हे नागपूरला ‘हॅपी सिटी’ अशी नवी ओळख देत असल्याचे त्या म्हणाल्या.
क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी स्पर्धा आयोजनामागील भूमिका विषद केली. क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजित खेळाडू आणि कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नृत्य स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर लावण्या वाघमारे हिने सादर केलेल्या गणेश स्तवनाने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. महेश सांडेकर यांनी ‘जाने कहाँ गये वो दिन’ या गीतावर नृत्य केले. महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते काही स्पर्धकांना गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. परिक्षकांचे स्वागतही नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.
अधिक वाचा : आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन थाटात