नागपूर : अजनी ते विमानतळ या मार्गावरील डबलडेकर उह्नाणपुलाचे काम मेट्रो प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाने संयुक्तपणे अतिशय गतीने केले. पण हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा अद्वितीय नमुना ठरला आहे. यामुळे मनीषनगरवासीयांना दिलासा मिळणार आहे. परंतु येत्या काही दिवसात मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग मार्गावर लवकरण नवा अंडरब्रीज साकारणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर शहराचे वैभव ठरलेल्या माझी मेट्रोसाठी वर्धा मार्गावर डबलडेकर उड्डाणपूल साकारण्यात आला असून यासोबतच मनीषनगरकडे जाण्यासाठी रेल्वे उड्डाणपुल आणि अंडरपासचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, गिरीश व्यास, प्रवीण दटके, महामेट्रोचे प्रबंध संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, मध्य रेल्वेच्या डीआरएम रिचा खरे तसेच महामार्ग विकास प्राधिकरणाचे राजीव अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी, नागपुरात उभारण्यात आलेला डबलडेकर फ्लायओव्हर देशभरातील एकमेवाद्वितीय बहुस्तरीय वाहतुक प्रणालीचा नमुना ठरली आहे. यात एकाच पिलरवर उड्डाणपुल आणि मेट्रोची रचना करण्यात आली आहे. यासोबतच मनीषनगरवासीयांसाठी रेल्वे ओव्हरब्रीज आणि उज्ज्वलनगर येथे अंडरपास तयार करण्यात आला आहे.
या व्यवस्थेमुळे शहरातील पांच लाख लोकांना लाभ होणार आहे. येत्या काळात विद्यमान रेल्वे क्रॉqसगखाली अंडरब्रीज तयार करण्याचा प्रस्ताव मंजुर झाला असून त्यासाठी २५ कोटींचा निधी देण्यात आला असल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ब्रॉडगेज मेट्रोला देखील मंजुरी मिळाली असून हा मार्ग नागपूर, गोंदिया, वडसा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, रामटेक असा राहणार आहे आणि त्याची गती १६० किमी प्रती तास अशी राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
या कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, हा उड्डाणपूल शहरासाठी गौरवाची बाब असून मेट्रोने देशभरात सर्वात गतीने काम पूर्ण केले. यापूर्वी रामझुल्याच्या कामात देखील तत्कालिन शासनाला गडकरी आणि फडणवीस यांनी सहकार्य केल्याचे सांगितले. येत्या काळात फुटाळा तलावाच्या कामाला देखील मंजुरी देण्यात आली असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवित प्रकल्पपूर्तीस शुभेच्छा दिल्या. संचालन श्वेता शेलगावर यांनी तर आभारप्रदर्शन प्रकल्प संचालक महेशकुमार यांनी केले.