आगामी पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचे केंद्र बनेल- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

NITIN GADKARI

नवी दिल्ली, 18 जून, 2020 : आगामी पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला. ते म्हणाले, या क्षेत्रासाठी शासन शक्य तितक्या उत्तम सवलती देण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच विजेवर चालणा-या वाहनांवर असलेला वस्तू आणि सेवा कर कमी करून तो 12 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

‘‘इंडियाज् इलेक्ट्रील व्हेइकल रोडमॅप पोस्ट कोविड-19’’ या वेबिनारला आज मार्गदर्शन करताना गडकरी म्हणाले, ‘इव्ही’ म्हणजेच इलेक्ट्रीक वाहन क्षेत्राला भेडसावणाऱ्या अडचणींची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. परंतु, या वाहनांच्या विक्रीचे प्रमाण वाढल्यानंतर आपोआपच आव्हाने कमी होवून परिस्थिती बदलणार आहे, अशी आपल्याला खात्री आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगामध्ये कोणत्याही देशाला चीनबरोबर व्यापार, व्यवसाय करण्याची इच्छा नाही. त्यामुळे ही एक भारतीय उद्योगांना नवीन संधी मिळत आहे. आपल्याला व्यवसायात बदल घडवून आणण्याची ही चांगली संधी कोविड-19 महामारीनंतर उपलब्ध होत आहे.

पेट्रोलिअमसारख्या इंधनाची उपलब्धता मर्यादीत आहे, हे लक्षात घेवून संपूर्ण जगालाच पर्यायी आणि स्वस्त ऊर्जा स्त्रोतांचा शोध घ्यावा लागणार आहे. हा विचार करून जैवइंधन आणि विजेवर चालणारी वाहने यांचा पर्याय म्हणून वापर करण्याची आवश्यकता आहे. काळानुरूप असे बदल घडवून आणताना सरकार वाहनांच्या स्क्रॅपिंगचे धोरणही निश्चित करत आहे. त्याचा लाभ स्वयंचलित वाहन निर्मिती क्षेत्राच्या विकासासाठी होणार आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

लंडनची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदर्शवत मानली जाते, असे सांगून गडकरी म्हणाले, तिथे खासगी आणि सार्वजनिक गुंतवणूक एकत्रितपणे चांगली कामगिरी करीत आहेत. अशाच पद्धतीची वाहतूक व्यवस्था स्वीकारली गेली तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आणि नागरी प्रशासनालाही लाभदायक ठरणार आहे. दिल्ली-मुंबई हरित मार्ग हा ‘इलेक्ट्रीक हाय वे’ म्हणून विकसित करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू करण्याचे संकेत गडकरी यांनी यावेळी दिले.

आपल्या देशातल्या वाहन क्षेत्राविषयी पूर्ण आत्मविश्वास व्यक्त करून गडकरी म्हणाले, या आर्थिक संकटावर मात करून बाजारपेठेत लवकरच चांगल्या संधी उपलब्ध होतील. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देवून वाहन उद्योगाने स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

Also Read- चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग