नागपूर : कापड व्यापाऱ्याला एक कोटी कर्जाचे आमिष दाखवून त्याची २६ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तहसील पोलिसांनी दोन ठगबाजांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ताहिरभाई समीऊल्ला खान (रा. गांधीबाग) व राधाकृष्ण ठोंबरे (रा. म्हाडा मॅरेथॉन टॉवर, लोअर परेल, मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कापड व्यापारी आशिष सतीश जैन (वय ४३, रा. तेलीपुरा, मस्कासाथ) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
ताहिरभाईचे गांधीबागेतील हॅण्डलूम बाजारात कापडाचे दुकान आहे. तर आशिष यांचे आयचित मंदिराजवळ अरिहंत क्रिएशन नावाचे कापडाचे शोरूम आहे. व्यवसायवाढीसाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यांनी ताहिरभाईसोबत याबाबत बोलणी केली. एक कोटी रुपये हवे असल्याचेही आशिष यांनी त्याला सांगितले. त्याने आशिष यांना मुंबईतील प्राइड ऑफ इंडिया वेलफेअर खादी सोसायटीबाबत माहिती दिली. या संस्थेद्वारे व्यापाऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळत असल्याचेही त्याने आशिष यांना सांगितले.
१ नोव्हेंबर २०१६ ला ताहिरभाई व आशिष हे संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण ठोंबरे याला भेटायला मुंबई येथे गेले. ठोंबरेने आशिष यांना कर्जाचे आमिष दिले. प्रक्रिया शुल्काच्या रूपात त्यांच्याकडून वेळोवेळी २६ लाख रुपये घेतले. मात्र, अडीच वर्षांनंतरही आशिष यांना कर्ज मिळाले नाही व २६ लाख रुपयेही परत मिळाले नाहीत. त्यांनी तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी ताहिरभाई व राधाकृष्ण ठोंबरेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
अधिक वाचा : नागपूर – गोरेवाडा प्राणिसंग्रहालयापासून काही अंतरावर ट्रकने तरुणीला चिरडले; मुलगा जखमी