नागपूर : उन्हाळा वाढत असून नागपूर शहरात उष्माघातामुळे जीवितहानी होउ नये यासाठी शहरातील रस्ते, बाजार, बसस्थानक, दवाखान्यांमध्ये तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी उष्माघात प्रतिबंधासंदर्भात प्रत्येक विभागामध्ये योग्य कार्यवाही करण्यात यावी. तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत उष्माघात प्रतिबंधक कृती योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागपूर शहरातील जनतेकरीता उष्माघात प्रतिबंधक कृती योजना २०१९ तयार केली असून या कृती योजनेच्या कार्यान्वयासंदर्भात मंगळवारी (ता.२६) अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या अध्यक्षतेत उष्माघात प्रतिबंधक समन्वय समितीची बैठक नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात आयोजित करण्यात आली. बैठकीत मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. सरीता कामदार, उष्माघात प्रतिबंध कृती योजनेच्या नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा मठपती, समन्वयक डॉ. विवेकानंद मठपती, सहायक आयुक्त महेश मोरोणे, प्रकाश वराडे, सुभाष जयदेव, राजु भिवगडे, गणेश राठोड, स्मिता काळे, सुवर्णा दखणे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी विजय जोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे डॉ. निलेश अग्रवाल, हवामान विभागाचे ए.व्ही. गोळे, वैज्ञानिक भावना, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अंकुश गावंडे, डॉ. जयश्री वाळके, उद्यान निरीक्षक अनंता नागमोते आदी उपस्थित होते.
वाढत्या उन्हाळ्यात नागरिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली भूमिका योग्यरित्या बजावून नागरिकांच्या संरक्षणासाठी योग्य कार्यवाही करावी. तसेच उष्माघात प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी प्रत्येक झोनमध्ये चमू तयार करण्याचेही निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले. गर्दीच्या ठिकाणी ग्रीन नेट लावणे, विविध ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करणे, सकाळी ६ वाजतापासून सायंकाळपर्यंत दिवसभर उद्यान सुरू ठेवणे, मनपाच्या सर्व दवाखान्यांमध्ये ग्रीन नेटची व्यवस्था करणे, दुपारच्या वेळेत बाजारपेठ बंद राहावी यासाठी व्यावसायीकांशी योग्य समन्वय साधणे यासह नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावयाची आहे, याबाबत जनजागृतीसाठी आशा कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण देण्याचेही निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले.
बैठकीत विविध विभागाच्या प्रतिनिधींनी उष्माघात प्रतिबंधासंदर्भात आपापली भूमिका स्पष्ट केली व यासंदर्भात विविध सूचनाही मांडल्या. या सूचनांची अंमलबजावणी करून नागरिकांसाठी सुविधा निर्माण करण्याबाबत तातडीने कार्यावाही करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांनी निर्देशित केले.
अधिक वाचा: नाना के समर्थक किसान की वेशभूषा में पहुंचे नागपुर