दुबई : यंदाचा टी२० वर्ल्डकप संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सांगितले होते. यावर आता आयसीसीने शिक्कामोर्तब केले आहे. आयसीसीने आज ही स्पर्धा १७ ऑक्टोबर पासून १४ नोव्हेंबरपर्यंत होणार आहे असे सांगितले.
आयसीसीने ‘भारतातील कोरोनाची स्थिती पाहता आयसीसीचा पुरुषांचा टी२० वर्ल्डकप २०२१ हा युएई आणि ओमानमध्ये होणार आहे.’ असे अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले. टी२० वर्ल्डकप हा पूर्वी भारतात होणार होता. पण, कोरोनामुळे तो आता युएईमध्ये होणार आहे. यासाठी चार ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय मैदान, अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियम, शारजा स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंड या मैदानावर टी२० वर्ल्डकप रंगणार आहे.
जरी वर्ल्डकप युएईमध्ये होत असला तरी या वर्ल्डकपचे आयोजकपद बीसीसीआयकडेच राहणार आहे. आयसीसीचे प्रभारी सीईओ गिओफ अलार्डेस यांनी सांगितले की ‘आयसीसी पुरुष टी२० वर्ल्डकप सुरक्षित आणि पूर्णत्वास नेणे ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही हा वर्ल्डकप भारतात आयोजित करु शकत नाही याबाबत निराशा आहे. आम्हाला अनेक संघांची स्पर्धा बायो सिक्युर वातावरणात यशस्वी आयोजित करुन दाखवलेल्या देशाची गरत होती.’
दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी ‘बीसीसीआय टी२० वर्ल्डकप युएई आणि ओमानमध्ये आयोजिक करणार आहे. आम्ही जर हा भारतात आयोजित करु शकलो असतो तर आनंद झाला असता. पण, भारतात कोरोनामुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे. ही जागतिक अजिंक्यपद स्पर्धा महत्वाची आहे. बीसीसीआय यापुढेही युएई आणि ओमानमध्ये स्पर्धा आयोजित करणार आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली.
याचबरोबर अमिराती क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झरुनी यांनी ‘टी२० वर्ल्डकप आयोजित करण्यासाठी बीसीसीआय आणि आयसीसीने अमिराती क्रिकेट बोर्डावर विश्वास दाखवला हा आमचा सन्मान समजतो. युएई हा एक मोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी सुरक्षित देश आहे अशी आमची प्रतिमा आहे. ही आमचे सरकार कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रतिबद्ध आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली.
ओमान क्रिकेट संचालक पंकज खिमजी यांनी ‘टी२० वर्ल्डकप आयोजनाचा एक भाग होणे हा ओमान क्रिकेटसाठी हा एक मोठा क्षण आहे. आम्ही बीसीसीआय आणि आयसीसीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करू.’ अशा भावना व्यक्त केल्या.