नवी दिल्ली: ऐन दिवाळीच्या काळात अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून (आयओसीएल) पत्रक जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानुसार अनुदानित सिलिंडरची किंमत २.९४ रूपये तर विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ६० रुपयांनी वाढणार आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.
आंतरराष्ट्रीय किंमती आणि परकीय चलनातील चढ-उतारांमुळे या किंमती वाढल्याचे स्पष्टीकरण ‘आयओसीएल’कडून देण्यात आले. सिलिंडरवरच्या करामुळे या किमती वाढल्या असून आधार मूल्यातही बदल होणार आहे. अनुदानित घरगुती सिलिंडरचे किंमत जूनपासून आतापर्यंत सहाव्यांदा वाढली आहे.
तेव्हापासून आतापर्यंत या सिलिंडरच्या किमतीत १४.१३ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. नव्या रचनेनुसार, आता अनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी ५०५.३४ रुपये मोजावे लागतील. तर विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी ८८० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, समाधानाची बाब इतकीच की घरगुती सिलेंडरसाठी सरकारकडून देण्यात आलेल्या अनुदानाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. त्यानुसार, आता ग्राहकांच्या बँक खात्यात ४३३.६६ रुपयांचे अनुदान जमा होईल.
अधिक वाचा : टीव्हीच्या रिमोटवरून बहीण-भावाचं भांडण; बहिणीची आत्महत्या