लोकप्रिय टिक टॉक वर हायकोर्टाची बंदी

चेन्नई: सध्या तरुणाईमध्ये ‘टिक टॉक’ या व्हिडीओ अॅपची मोठी क्रेझ आहे. या अॅपद्वारे अनेकजण एखादे गाणे किंवा डायलॉगवर अभिनय करुन व्हिडीओ बनवतात आणि फेसबुक, व्हॉट्सअप यांसारख्या सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण गेल्या कित्येक दिवसांपासून या अॅपच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ समोर येत होते. यामुळे मद्रास हायकोर्टाने ‘टिक टॉक’ अॅपवर बंदी घालण्याचे केंद्र सरकारला आदेश दिले आहेत. त्यामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला ‘टिक टॉक’ आता लवकरच बंद होणार आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून ‘टिक टॉक’ या म्युझिकल व्हिडीओ अॅपने तरुणांना अक्षरश: वेड लावले आहे. या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट करत होते. पण कित्येकदा ‘टिक टॉक’द्वारे अश्लील व्हिडीओही तयार करण्यात येतात. त्यामुळे ‘टिक टॉक’वर बंदी घालावी, अशा प्रकारची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान ‘टिक टॉक’ अॅपच्या डाऊनलोडिंगवर बंदी घालावी असे आदेश हायकोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. तसंच सर्व प्रसारमाध्यमांनीही टिक टॉकवर तयार करण्यात येणार व्हिडीओ प्रदर्शित करणे टाळावे, असेही हायकोर्टाने म्हटलं आहे.

त्याशिवाय या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारची चांगलीच कानउघडणी केली आहे. अमेरिकेत 18 वर्षाखालील मुलांसाठी चिल्ड्रेन ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन कायदा आहे. मग तसाच कायदा आपल्याकडे का तयार केला जात नाही, असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला आहे. तसंच लवकरात लवकर इतर देशाप्रमाणे आपल्या देशातही 18 वर्षाखालील मुलांसाठी चिल्ड्रेन ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन कायदा करावा, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. याबाबत पुढील सुनावणी 16 एप्रिलला होणार आहे.

गेल्या महिन्यात ‘टिक टॉक’ या अॅपमुळे तमिळ संस्कृतीचे पालन होत नसल्याचे तमिळनाडू सरकारने सांगितले होते. या अॅपमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे. ज्याप्रमाणे ‘ब्ल्यू व्हेल’ या गेमिंग अॅपवर बंदी घालण्यात आली होती, तशाचप्रकारे या अॅपवरही बंदी घालावी अशी मागणी तमिळनाडू सरकारने केंद्र सरकारला केली होती.

‘टिक टॉक’ हे चीनमध्ये तयार करण्यात आलेले अॅप आहे. चीनमध्ये हे अॅप ‘डॉयइन’ नावाने प्रसिद्ध आहे. सप्टेंबर 2016 साली चीनने ‘डॉयइन’ या अॅपला चीनच्या ऑनलाईन मार्केटमध्ये लाँच केलं होत. त्यानंतर वर्षभरात ‘टिक टॉक’ या नावाने हे अॅप जगभरात लाँच झाले. 73 एमबीचे हे अप असून याचे 500 मिलियन पेक्षा जास्त युजर्स आहेत.

अधिक वाचा : उपअभियंता डी.पी. चिटणीस यांच्यासह मनपाचे २५ कर्मचारी सेवानिवृत्त