नागपूर : शनिवारनंतर रविवारीदेखील नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. रविवारी शहरात कमाल ४६.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील हे सर्वाधिक तापमान ठरले. शिवाय या मोसमातील नागपुरातील हा सर्वाधिक उष्ण दिवसदेखील ठरला. दररोज तापमानात वाढ होत असून पारा आणखी वाढू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
मे महिना सुरू झाल्यानंतर सातत्याने नागपूरचे तापमान वाढत आहे. मागील काही दिवसापासून उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. रविवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवायला लागला होता. शहरात ४६.७ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान सरासरीहून ३.९ अंश सेल्सिअसने अधिक असून २४ तासातच तापमानात ०.२ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. रात्री उशिरापर्यंत उष्ण वारे वाहतच होते. घरांमध्ये नागरिकांना कुलरमुळेदेखील दिलासा मिळाला नाही.
नागपूरकरांसाठी परीक्षेचा आठवडा
हवामान विभागातर्फे विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात उष्णता कायम राहील व तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वाढत्या तापमानामुळे अगोदरच हैराण होत असलेल्या उपराजधानीतील नागरिकांसाठी पुढील काही दिवस परीक्षेचे ठरु शकतात.
Also Read- देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात