नागपूर,ता. ६ : आजच्या धावत्या युगात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. स्पर्धेच्या युगात कामाचा ताण वाढताना नेहमीच आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. सुदृढ आरोग्यासाठी दैनंदिन व्यायामासह पौष्टीक आहारही अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्त्री रोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, आधार, इंडियन डायेटिक असोशिएशन आणि विष्णूजी की रसोई यांच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय ‘पोषण आहार प्रदर्शनी’चे गुरुवारी (ता. ६) कविवर्य सुरेश भट सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, नागपूर स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्ष डॉ. कांचन सोरते, सचिव डॉ. सुषमा देशमुख, इंडियन डायेटिक असोशिएशनच्या अध्यक्ष डॉ. रिता भार्गव, सचिव कविता बक्षी उपस्थित होते.
यावेळी महापौर म्हणाल्या, आपल्या जीवनामध्ये अन्नाचे विशेष महत्व आहे. त्यामुळेच अन्नाला पूर्णब्रम्ह असे म्हटले जाते. यशस्वी आयुष्याची इमारत उभारताना त्याचा पाया म्हणजे उत्तम आरोग्य भक्कम असणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य व पौष्टीक आहार आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. सुदृढ आरोग्यासाठी जसे व्यायामाची गरज आहे, तसेच आपण घेत असलेले दररोजचे अन्नही पौष्टीक असणे आवश्यक आहे. आपण घेत असलेले अन्न पौष्टीक आहे अथवा नाही किंवा कोणत्या वयात कसे अन्न घ्यायचे याची माहिती मिळविण्यासाठी असे कार्यक्रम महत्वाचे ठरतात, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाले.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी गुरूवारी (ता. ६) पौष्टीक आहाराबाबत शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विविध वयोगटातील स्त्रियांचे आहार व आरोग्य यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. सकाळच्या सत्रात गर्भवती महिलांसाठी आहार, लहान मुलांसाठी आहार,पन्नाशी नंतरच्या महिलांसाठी आहार, बेशुद्ध रुग्णांना नळीने देण्यायोग्य आहार यासह विविध वयोगटासाठी महत्वाच्या आहाराबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय विविध आजारांवर घ्यावयाचा आहार, मधुमेह, कर्करोग प्रतिबंध आहार, बद्धकोष्ठता, किडनी स्टोनसाठी आहार या विषयावर दुपारच्या सत्रात चर्चा करण्यात आली. दोन्ही चर्चासत्रात विशेष तज्ज्ञ डॉक्टर व आहार तज्ज्ञांचा समावेश होता. सकस आहार पौष्टीक कसा बनवायचा याबाबत प्रख्यात शेफ विष्णू मनोहर हे व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी विष्णुजी की रसोईचे प्रवीण मनोहर व विजय जथे यांनी व्हिडीओतील आहाराचे विश्लेषण करून उपस्थित प्रश्नांवर चर्चा केली.
बाल्यावस्था व पौगंडावस्थेतील मुलींसाठी विशेष आहाराचे मार्गदर्शन, प्रजननशील अवस्थेतील स्त्रियांसाठी समतोल आहारवर मार्गदर्शन, गर्भवती महिलांसाठी पोषक आहार तत्त्वांची आखणी, प्रौढावस्था व वृद्धापकाळातील महिलांसाठी आहारविषयक माहिती, गर्भावस्थेतील मधुमेह (डायबेटिस), रक्तदाब (हायपरटेंशन), हृदयविकार, मूत्रपिंड विकार अशा वेगवेगळ्या आजारांवरील आहाराचे मार्गदर्शन, पॉलसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, लठ्ठपणा यावर विशेष आहार मार्गदर्शन, विस्मृतीत गेलेल्या पौष्टिक पाककृतींबद्दल माहिती, आहारविषयक व्याख्यान, प्रात्यक्षिके, प्रश्नोत्तरे आदींद्वारे सुदृढ आरोग्याबाबत जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
उद्या शुक्रवारी (ता. ७) सकाळी ११ वाजता महाविद्यालयीन युवतींसाठी ‘डायेट प्रिंसेस’ आणि महिलांसाठी ‘डायेट क्वीन’ ह्या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर शालेय गटातील मुलींसाठी आहारविषयक प्रश्नमंजुषा घेण्यात येणार आहे. याशिवाय ‘विस्मृतीत जात असणाऱ्या पौष्टिक भारतीय पाककृती’ व ‘न्यूट्रीशियन पाककृती’ या दोन विषयावर पाककृती स्पर्धा घेण्यात येईल. दुस-या दिवशीही विष्णू मनोहर व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. पोषण आहार प्रदर्शनीमध्ये कविवर्य सुरेश भट सभागृहात विविध अन्नघटकांची माहिती दर्शविणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सवर विविध अन्नघटकांचे आहारातील महत्व पटवून देण्यात आले.
अधिक वाचा : पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन