नागपूर, ता.२९ : स्वच्छ सर्वेक्षणातून देशात क्रमांक एकवर असलेल्या इंदोर शहरातील महानगरपालिकेच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी नागपूर महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या नेतृत्वात स्थायी समिती, आरोग्य समितीचे सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अभ्यास दौरा केला. इंदोर मनपाच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत तेथील इंदोर आणि नागपूरमध्ये राबविण्यात आलेल्या प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात आली.
विशेष म्हणजे स्वछतेच्या बाबतीत इंदोर आज क्रमांक एक वर असले तरी नागपूर मध्ये अधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ‘स्मार्ट घड्याळी’ची आणि अन्य काही उपक्रमांची प्रशंसा इंदोरमधील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी केली. घड़याळीचे मॉड्यूल इंदोरमध्ये राबविण्याचा मानस त्यांनी नागपूरच्या प्रतिनिधी मंडळासमोर व्यक्त केला.
या अभ्यास दौऱ्यात स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह आरोग्य समिती सभापती मनोज चापले, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने, विभागीय अधिकारी दीनदयाल टेंभेकर, रामभाऊ तिडके यांच्यासह स्थायी आणि आरोग्य समितीचे सदस्य सहभागी झाले होते.
काय बघितले इंदोरमध्ये?
सदर अभ्यास दौऱ्यात नागपूर महानगरपालिकेच्या प्रतिनिधी मंडळाने तेथील स्वच्छतेबाबत माहिती घेतली. इंदोर शहरातील नागरिक स्वच्छतेबाबत कमालीचे जागरुक आहेत. इंदोर शहरात प्रत्येक घरातील कचरा विलग होऊनच बाहेर पडतो. इंदोर शहरातील संपूर्ण कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक इंदोर महानगरपालिकेद्वारेच करण्यात येते. इंदोर महानगरपालिकेअंतर्गत १९ झोन असून ८५ वॉर्ड आहेत. सुमारे ६०० कचरा गाड्या कचरा संकलन करतात. ८५ वार्ड मध्ये प्रत्येकी एक मोठे वाहन देण्यात आले आहे. शहरात कचरा संकलनासाठी १० ट्रान्सपोर्ट स्टेशन आहे. घराघरांतून संकलित केलेला कचरा या ट्रान्सपोर्ट स्टेशनवर छोट्या कचरागाड्यांद्वारे आणण्यात येतो. तेथून तो डम्पिंग यार्डला पाठविला जातो. डम्पिंग यार्डमध्ये संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
बाजार परिसरात कचरा संकलनाचे कार्य तीन पाळीत केले जाते. तेथील कचरा डम्पिंगसाठी स्वतंत्र यूनीट असून या कचऱ्यापासून सीएनजी गॅस तयार केला जातो. तेथून निर्मित होणाऱ्या सीएनजीवर शहर बस वाहतुकीतील १२ बसेस धावतात. ३१ मार्च २०१९ पर्यंत संपूर्ण बसेस सीएनजीवर चालविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिनिधी मंडळाला सांगण्यात आले. घराघरांतून आणि व्यापारी प्रतिष्ठांनामधून उचलण्यात येणाऱ्या कचऱ्यावर ‘वापर शुल्क’ आकारले जाते. शहरातील संपूर्ण मोठे रस्ते स्वच्छ करण्यासाठी स्वीपींग मशीनचा वापर करण्यात येतो. सध्या १२ स्वीपींग मशीनद्वारे रस्त्यांची सफाई सुरू आहे. स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर मशीनारिजचा वापर तेथे करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांची मानसिकताही बदलली असून प्रत्येक अधिकारी स्वच्छतेसाठी वेळ देतात.
पदाधिकारी-अधिकाऱ्यांसोबत विचारांची देवाणघेवाण
सदर अभ्यास दौऱ्यात नागपूर महानगरपालिकेच्या प्रतिनिधी मंडळाने इंदोर महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या चर्चेत विचारांची देवाणघेवाण झाली. इंदोर शहरात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या सर्व नावीन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती नागपूर येथील प्रतिनिधीमंडळाला देण्यात आली. स्मार्ट सिटी प्रकल्प आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्राप्त झालेल्या निधितूनही मोठ्या प्रमाणात स्वछतेवर काम झाल्याचे सांगण्यात आले. नागपुरात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती इंदोरच्या पदाधिकारी-अधिकाऱ्यांना देण्यात आली. प्रतिनिधी मंडळाने या दौऱ्यात नागरिकांशीही संवाद साधला.
अधिक वाचा : उपायुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला गणेशोत्सव तयारीचा आढावा