नागपूर : येत्या शनिवारी, ६ एप्रिल रोजी येत असलेल्या गुढीपाडव्यापासून शालिवाहन शक १९४१ विकारी सवंत्सराला प्रारंभ होत आहे. यानिमित्त सूर्योदयाला घरासमोर उंच जागेवर गुढी उभारून तिची पूजा करावी, असे महाराष्ट्रीय पंचांगकर्त्या विद्याताई राजंदेकर यांनी म्हटले आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुढीपाडवा म्हणजेच वर्षप्रतिपदा शककर्त्या शालिवाहन राजाने जी कालगणना सुरू केली त्याचे नवीन वर्ष शके १९४१ हे ६ एप्रिलपासून सुरू होईल. यादिवशी सकाळी कडुनिंबाची कोवळी पाने व फुले आणून त्याचे चूर्ण करावे व त्यात मिरे, हिंग, मीठ, जिरे, ओवा, गूळ हे पदार्थ घालावेत. त्याच्या लहान गोळ्या करून त्या भक्षण केल्यास आरोग्य चांगले राहते.
विकारी संवत्सराच्या वर्ष प्रवेश कुंडलीत कर्क हे चरराशीचे लग्न उदित असल्याने यावर्षी देशाच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत झपाट्याने स्थित्यंतरे घडतील. २ मे रोजी शनी व केतू एकत्र येत असल्याने उष्णतेचे विकार, उष्माघात, आगीपासूनचे अपघात वाढतील. षष्ठस्थानातील गुरु, शनी, शत्रुराष्ट्रांना जरब बसविणारे आहेत. तथापि, २२ एप्रिलला गुरूच्या वृश्चिक राशी प्रवेशानंतर समाजात कलह, धार्मिक बाबीवरून अशांती निर्माण होण्याची शक्यता आहे. मे ते सप्टेंबर या काळात शनी वक्री असल्याने सत्ताधारी पक्षाला कसोटीच्या प्रसंगातून जावे लागेल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बंगाल, काश्मीर या भागात नुकसानकारक योग, नैसर्गिक आपत्तीची शक्यता आहे, असे राजंदेकर यांनी म्हटले आहे.
या वर्षात १६ जुलैला होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारताच्या मेदिनीय, मकर राशीतून होईल. तसेच २६ डिसेंबरला होणारे कंकणाकृती सूर्यग्रहणही भारताच्या मेदिनीय राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. कलियुगामध्ये सहा शककर्ते आहेत. पहिला इंद्रप्रस्थामध्ये युधिष्ठिर झाला. त्याचा शक ३०४४ वर्षे. दुसरा उज्जयनीमध्ये विक्रम झाला. त्याचा शक १३५ वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन झाला, त्याचा शक १८ हजार वर्षे. चौथा वैतरणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक दहा हजार वर्षे राहील. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल. त्याचा शक चार लक्ष वर्षे राहील. सहावा कोल्हापपूर प्रांतात कल्की होईल. त्याचा शक ८२१ वर्षे अशी कलियुगाची एकूण ४ लक्ष ३२ हजार वर्षे आहेत. यापैकी आतापावेतो ५१२० वर्षे झाली असून, ४ लक्ष २६ हजार ८८० वर्षे शिल्लक आहेत, असेही राजंदेकर यांनी सांगितले.
अधिक वाचा : मनपा आयुक्तांचे निर्देश : नदी स्वच्छता तयारी आढावा बैठक