नागपूर : पट्टे वाटपासंदर्भात येणारे सर्व अडथळे शासनाने दूर केले आहेत. खासगी जागा, झुडपी जंगल व रेल्वेच्या जागा वगळता इतर जागांबाबत येत्या तीन महिन्यांत योग्य कार्यवाही करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी दिले.
नागपूर महानगरपालिकेंतर्गत धरमपेठ, नेहरूनगर, हनुमान नगर, लक्ष्मीनगर, धंतोली, गांधीबाग झोनमध्ये घेण्यात आलेल्या ‘जनसंवाद’मधील शासन स्तरावरील तक्रारींचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठपुरावा केला. यासंबंधी शनिवारी (ता. २) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध तक्रारींसंदर्भात आढावा बैठक घेतली.
बैठकीमध्ये आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आयुक्त अभिजीत बांगर, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, हनुमान नगर झोन सभापती रूपाली ठाकूर, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह सहाही झोनचे नगरसेवक, सहायक आयुक्त उपस्थित होते.
पट्टे वाटपासंबंधी राज्य शासनाने नवीन निर्णय घेतला आहे. त्यामुळे यासाठी आता अभिन्यासाची गरज नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुविधांसाठी तात्काळ संपूर्ण कार्यवाही पूर्ण करून जून २०१९ पर्यंत संपूर्ण पट्टे वाटप पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. रमना मारोती परिसरात बस स्टॉप ते ईश्वर नगर येथील प्रस्तावित सीमेंट रोडच्या नालीच्या उतारामुळे संपूर्ण पाणी नागरिकांच्या घरात जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधी आयुक्तांना स्वत: या ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करण्याचेही निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
इंदिरा कॉलनी परिसरात उद्यानाच्या जागेवर अतिक्रमण करून नागरिकांना अडथळा निर्माण करण्याच्या तक्रारीवरून या जागेचा ताबा घेऊन मनपाच्या मालकीचे फलक लावणे व नागरिकांच्या सुविधेसाठी उद्यानाच्या विकास कामाला तात्काळ सुरूवात करण्याचेही निर्देश यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. कचरा, गवत व सांडपाणी सोडण्यात येत असल्याने सक्करदरा तलावाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. तलावालगत असलेल्या उद्यानात मंगलकार्याला परवानगी देण्यात आल्याने त्याचा परिणाम तलावाच्या सौंदर्यीकरणावर पडतो. त्यामुळे मंगलकार्याची परवानगी काढणे व परिसरातील सिवर लाईनचे सर्व्हे करून तलावात सांडपाणी सोडणारे दुकानदार, घरांची परवानगी रद्द करून गुन्हा दाखल करण्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले.
दीक्षाभूमी पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्य व जीवनचरित्र्यांची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा मिळवून देण्याबाबत आवश्यक पूर्तता करून प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. याशिवाय शहरात विविध भागात गतिरोधक लावण्याबाबत रस्ते सुरक्षा समितीकडून मान्यता घेउन तात्काळ मंजुरी देणे व महिनाभराच्या आत सर्व सहायक आयुक्तांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले. धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्राफिक पार्क चालू करण्याबाबत आयुक्तांनी स्वत: दौरा करून यासंबंधी अंतिम निर्णय घेण्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले.
अधिक वाचा : नागपूर महानगरपालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा