नागपुरात ओमायक्रॉनचा समूह संंसर्ग!

Coronavirus Nagpur: एप्रिलमध्ये कोरोनामुळे झाला सात मुलांचा मृत्यू

नागपूर : ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या नागपूर जिल्ह्यात ३० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, यातील १३ रुग्णांची विदेशी प्रवासाची पार्श्वभूमी नाही. शिवाय, ज्या वेगाने रुग्ण वाढत आहे ते पाहता ओमायक्रॉनचा हा समूह संंसर्ग असल्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवीत आहे.

‘ओमायक्रॉन’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेतूनच जगभरात पसरला. ‘डेल्टा’पेक्षाही हा व्हेरिएंट तिपटीने अधिक वेगाने पसरत असल्याने धोका वाढला. नागपूर जिल्ह्यात १२ डिसेंबर रोजी ओमायक्रॉन बाधित पहिल्या रुग्णाची नोंद झाली. ४० वर्षीय हा रुग्ण पश्चिम आफिक्रेतून नागपुरात आला. त्यानंतर ११ दिवसांनी, नंतर ५ दिवसांनी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. मात्र, मागील सहा दिवसात २४ रुग्णांची नोंद झाली. यात ५ जानेवारी रोजी आढळून आलेल्या ११ पैकी ७ तर ६ जानेवारी ६ पैकी ५ रुग्णांची विदेश प्रवासाची पार्श्वभूमी नाही. प्राप्त माहितीनुसार, ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढल्याने आता जिनोम सिक्वेन्सिंगही कमी होण्याची शक्यता आहे.

‘एस जीन फेल्युअर’ रुग्णांचीच जिनोम सिक्वेन्सिंग

विदेशातून नागपुरात येऊन कोरोना पॉझिटिव्ह झालेल्यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेमध्ये पाठविले जातात. यात ज्या नमुन्यात ‘एस जीन फेल्युअर’ आढळून येते, तेच नमुने ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी पुणे किंवा दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठविले जातात. सूत्रानुसार,‘एस जीन फेल्युअर’रुग्णांची संख्या १०० वर आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. हे रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह येण्याची शक्यता अधिक राहत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे

-सहा दिवसात कोरोनाचे १३१८ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात सहा दिवसात कोरोनाचे १ हजार ३१८ रुग्णांची नोंद झाली. बाधित रुग्णांचा हा वेग प्रचंड आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक रुग्णाची ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ करणे शक्य नाही. ओमायक्रॉनचा संसर्ग असलेल्या रुग्णांमध्ये सौम्य किंवा लक्षणेविरहित रुग्ण अधिक आहेत. सध्या अशा रुग्णांची संख्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यावरून हे रुग्ण ‘ओमायक्रॉन’चे असावेत, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-कम्युनिटी स्प्रेड होईलच!

ज्या वेगाने रुग्ण वाढत आहेत व त्यांच्यात सौम्य किंवा लक्षणे नसल्याचे दिसून येत आहेत. यावरून ओमायक्रॉन व्हेरिएंटचा कम्युनिटी स्प्रेड म्हणजे समूह संसर्ग झाल्याचे हे चित्र आहे. येत्या काही दिवसांत या व्हेरिएंटचा ‘कम्युनिटी स्प्रेड’ होईलच यावर दुमत नाही.