नागपूर : नागपूर शहराची ओळख ठरुन बंद पडलेली ग्रीन बस पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. सध्या अडगळीत पडलेल्या या बस वर्षारंभी पुन्हा रस्त्यावर धावणार आहे. रेड बसचा एक कंत्राटदार असलेल्या ‘ट्रॅव्हल्स टाईम’ या कंत्राटदाराने दिलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून, आता केवळ बसचे मुळ मालक असलेल्या ‘स्कॅनिया’ कंपनीकडून हिरवी झेंडीची प्रतीक्षा आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरणपुरक बस सुरू करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला होता. मात्र,प्रारंभापासूनच ही बस तोटयात धावत असल्याने शेवटच्या टप्प्यात ही बस बंद पडली. या बसचा प्रवास विविध राज्यातील शहरातही करण्यात आला. पारंपारिक इंधनापासून होणारे प्रदुषण टाळण्यासाठी ही बस सुरू करण्यात आली होती. इथेनॉलमिश्रीत इंधन स्वस्त असल्याने तसेच पर्यावरणाच्यादृष्टीने फायद्याचा असल्याने या बसचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, या इंधनाचा दर जास्त असल्याने जास्त तिकीट दरामुळे प्रवाशांनी प्रवास नाकारला. बस चालविण्यापेक्षा मेंन्टेनंन्सचा खर्च अधिक असल्याने स्कॅनिया कंपनीने ही सेवाच बंद करण्याचा निर्णय घेतला. या बसचा ५ कोटीचा निधीही मनपाकडे थकीत आहे. बससेवेचा तोटा व थकबाकी मिळत नसल्याने अखेर स्कॅनिया कंपनीने ही सेवाच बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाला रितसर नोटीसही बजावली होती. स्कॅनिया ही कंपनी या बसच्या उत्पादन क्षेत्रात आहे.
सेवा क्षेत्रात काम नसल्याने केवळ आग्रहाखातर ही सेवा सुरू करण्यात आली होती. गडकरी यांनी यासाठी आग्रह केला होता. सेवा बंद केल्यानंतरही ती पुन्हा सुरू व्हावी यासाठीही गडकरींनी शिष्टाई केली होती. मात्र, स्कॅनिया कंपनीने त्यांचे भारतातील सर्व प्रकल्प गुंडाळल्याने ही सेवा बंद करण्यावर ठाम राहीली. दरम्यान, ही सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी मनपातर्फे प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार रेड बस चालविणारी एक कंपनी ट्रॅव्हल्स टाईमने ही सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. यासाठी २५ ग्रीन बस खरेदी करण्याचीही तयारी दर्शविली. त्यामुळे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांच्या मध्यस्थीनी ट्रॅव्हल्स टाईम कंपनीच्या संचालकांची स्थायी समितीसोबत बैठकही झाली. यात सकारात्मक निर्णय घेण्यात आला. आता केवळ स्कॅनिया कंपनीच्या होकाराची गरज आहे.
इलेक्ट्रीक बससाठीही प्रयत्न
दरम्यान, इलेक्ट्रीक बसही नव्या वर्षात सुरू व्हावी असे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्य सरकारने मनपाला पाच इलेक्ट्रीक बस खरेदीसाठी दिलेले ९.२५ कोटीचा निधी प्रशासनाने इतरत्र वळविला आहे. हा निधी परिवहन विभागाला मिळाल्यास इलेक्ट्रीक बसही सुरू करण्यात काहीच अडचण राहणार नाही, असे कुकडे यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा : ताडोबा वन क्षेत्रात विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू