असेल ‘आजीबाईचा बटवा’, तर बसणार नाही ‘कोरोनाचा फटका’

असेल ‘आजीबाईचा बटवा’, तर बसणार नाही ‘कोरोनाचा फटका’

नागपूर : सामान्य आजारपण, नियमित व्हायरल फीव्हर, सर्दी, खोकला, पोटदुखी आदींच्या समस्येसाठी डॉक्टरांकडे जाणे, ही सामान्य बाब आहे. कोरोना संक्रमण काळात तर डॉक्टरांच्या मिटिंगमध्ये चौपटीने वाढ झाली आहे. मात्र, सामान्य बाबींसाठी डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येऊ नये म्हणून आजीबाईचा बटवा ही प्रचलित परंपरा आहे. काळाच्या ओघात ही परंपरा लय पावली. मात्र, कोरोना संक्रमणामुळे आजीबाईचा बटवा पुनरुज्जीवित झाल्याचे दिसून येते. विशेषत: पूर्व संरक्षण म्हणून कोरोनाकाळात रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदावर आधारित आजीबाईचा बटवा अनेकांना आधार ठरल्याचे दिसून येते.

औषधीय मसाले आणि महिलांची चाणाक्ष वृत्ती                                                                              जुन्या काळात आजारी व्यक्तीला तपासण्यासाठी वैद्य घरी येत असत. दळणवळणाची साधणे आणि लांबचा प्रवास असल्याने आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ येणे शक्य नव्हते. त्यामुळे, वैद्य घरातील ज्येष्ठांना, विशेषत: ज्येष्ठ महिलेला स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या औषधीय मसाले किंवा घराच्या अंगणात उपलब्ध असलेल्या वनस्पतींचा उपयोग करून आजारी व्यक्तीस द्यावयाच्या मात्रांची रचना करून देत. अशा नोंदी त्यावेळी महिलावर्ग मुखपाठ करून घेत. पुढे हाच आजीबाईचा बटवा म्हणून रूढ झाला आणि वर्षानुवर्षे याचा लाभ नंतरच्या पिढीने घेतला.

ऋतूसंधीवरील उपचार                                                                                                            भारतीय वातावरणानुसार सहा ऋतू अर्थात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर अशा सहा ऋतूंची रचना आहे. यापैकी प्रत्येक दोन ऋतूंचा होणारा मेळ हा ऋतूसंधी म्हणून गणला जातो. दोन ऋतूंमधील पर्यावरणीय हवापालट असल्याने मानवी शरीर हा बदल चटकन स्वीकारत नसते आणि त्यामुळे साधारणत: प्रत्येक व्यक्ती सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी अशा समस्यांनी काही दिवस ग्रस्त असतो. अशावेळी उपयोगात येतो तो ‘आजीबाईचा बटवा’. यात विशेषत: स्वयंपाक घरातील मसाले व गावखेड्यात जंगल परिसरात उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींचा समावेश असतो.

रोगप्रतिकार क्षमता वाढवा आजार पळवा                                                                                    जिरा व कलमीचे उकळून पिलेले पाणी घेतले म्हणजे ज्वर शांत होतो. आले व हळद कुसकरून घेतले की ठसका उतरतो आणि खोकला बंद होतो आदी अनेक उपचार सर्वसामान्य आहेत. हे उपचार पुढच्या पिढीपर्यंत गेले, त्याचे कारण म्हणजे आजीबाईचा बटवा हाच आहे. मात्र, आता हे उपचार घेण्यास अनेकजण कचरतात. डॉक्टरांनाच प्राधान्य दिले जात आहे. काळानुसार हा बदल असतो. मात्र, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हा बटवा उत्तम आहे.

कशाचा काय फायदा?

मीठ व हळदीच्या पाण्याच्या गुळण्या                                                                                        कोमट पाण्यात मीठ व हळद टाकून त्याच्या गुळण्या केल्याने घशातील विषाक्त पदार्थ तत्काळ निघून जातात. घशातील जडपण कमी होतो आणि बसलेला घसा मोकळा होतो.

हळद, आले, कलमी, जिरा आदींचा काढा                                                                                  हळद, आले, कलमी, जिरा आदींचा काढा पिल्याने शरीरातील विषाक्तता लघवीवाटे बाहेर पडते. सोबतच यातील औषधीय तत्त्व शरीराची प्रतिकार क्षमता वृद्धिंगत करते. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी दूर होते. मात्र, अति पिल्याने त्याचे दुष्परिणामही आहेत. त्यामुळे मात्रेतच घेणे योग्य.

आले व हळद                                                                                                                   आले ठेचून व हलकीच भाजलेली हळद मिसळून ते तसेच घेतल्यास ठसका पातळ होतो आणि तत्काळ निघतो. दोन्ही औषधीय वनस्पती असल्याने शरीर मजबूत बनते.

पूर्वी कुणालाही काही त्रास वाटला की घरातील ज्येष्ठ मंडळी प्रामुख्याने आजी काहीना काही घरगुती उपचार करून स्वस्थ करीत असे. कोरोनामुळे परत आजीबाईच्या बटव्याची आठवण होत आहे. हळद, मिरे, लसूण, तुळस, मेथी, जिरे, हिंग, धने अशा अनेक औषधींचा वापर आजीबाईच्या बटव्यात होतो आणि सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, अतिसार, लहान मुलांचे त्रास घरच्या घरी याच बटव्यातून संपवले जात होते. आजही संसर्गजन्य आजारामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याचा वापर होत आहे. मात्र, आजाराची लक्षणे वेळीच थांबत नसतील तर वेळ न दवडता लगेच जवळच्या वैद्यांशी संपर्क साधणे योग्य ठरेल.