मुंबई: अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पण गणित विषय न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) बारावीला गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) विषय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय गाभा समजले जातात. मात्र, 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी AICTE संस्थेने या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता संस्थेने 14 विषयांची यादी जाहीर केली असून यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान 45 टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
शिक्षण क्षेत्रातून निर्णयाला विरोध
वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे म्हणून AICTE ने हा निर्णय घेतला असला तरी याला शिक्षण क्षेत्रातून विरोध होताना दिसत आहे. गणित हा विषय अभियांत्रिकीच्या सर्व विषयांचा पाया आहे. प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी गणिताचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी काळात हा विषय चर्चेचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
नवे 14 विषय कोणते?
2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी AICTE संस्थेने या नियमांमध्ये बदल केले आहेत. यंदाच्या वर्षापासून अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा अंतर्भाव असेल.