पलामू : ‘सावधान इंडिया’ किंवा ‘क्राइम पेट्रोल’ सारख्या टीव्ही मालिकेतील कथानकाप्रमाणे एक प्रकरण समोर आलं आहे. एका युवकाने आपल्या मित्राच्या प्रेयसीबरोबर शारिरीक संबंध ठेवल्याची आणि ती गरोदर झाल्यानंतर तिची हत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढं सगळं घटल्यानंतरही संबंधित घटनेचा थांगपत्ताही मृत युवतीच्या पहिल्या प्रियकराला लागला नाही. याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात दुसरा प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील हुसेनाबाद येथील आहे. येथील एका अल्पवयीन मुलीचं एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी या दोघांकडेही फोन नव्हते. त्यामुळे प्रियकर आपल्या मित्राच्या फोनवरून तर प्रेयसी आपल्या वडिलांच्या किंवा भावाच्या फोनवरून एकमेकांशी संपर्क करायचे. त्यांचे प्रेमसंबंध काही दिवस असेच चालू होते. त्यानंतर प्रियकर नोकरीच्या निमित्ताने गुजरातला निघून गेला. त्यामुळे दोघांचा संपर्क पूर्णपणे तुटला. याचा फायदा प्रियकराच्या मित्राने उठवला आहे.
दरम्यानच्या काळात संबंधित अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकराची विचारपूस करण्यासाठी प्रियकराच्या मित्राला फोन करत असे. त्यानंतर प्रियकराचा मित्र आणि संबंधित अल्पवयीन मुलगी यांच्यातच मैत्री झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर यांनी एकमेकांशी शारिरीक संबंधही ठेवले. परिणामी संबंधित अल्ववयीन मुलगी गरोदर झाली. याची माहिती तिने आपल्या दुसऱ्या प्रियकराला दिली. तिने गर्भपात करण्याची अथवा लग्न करण्याची अट त्याच्यासमोर ठेवली. त्यानंतर दुसऱ्या प्रियकराने गरोदर प्रियसीचा गर्भपात करण्यासाठी जवळच्याच एका रुग्णालयात घेवून गेला. पण तेथील नर्सने गर्भपात करण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली.
गर्भपात करण्यासाठी 10 हजार रुपयांचं नियोजन तो करू शकला नाही. त्यामुळे आरोपी नीरज सिंह याने आपल्या गरोदर प्रेयसीचाच काटा काढण्याचा प्लॅन केला. नीरज सिंहने आपला मित्र ओमप्रकाशच्या मदतीने संबंधित मुलीच्या हत्येचा कट रचला. यानंतर आरोपी नीरज सिंहने मुलीला फोन करून आपण पळून जावून लग्न करू अशी खोटी माहिती दिली. संबंधित मुलगीही आरोपीच्या जाळ्यात अडकली आणि तिने प्रियकर नीरज सिंहला भेटायला गेली.
पण आरोपीने नियोजन केल्याप्रमाणे संबंधित मुलीची गळा चिरून हत्या केली आणि मुलीचा मृतदेह एका जवळच्या शेतात नेवून पुरला. ही घटना 21 फेब्रुवारी घडली असून हत्येच्या सहा दिवसांनी म्हणजेचं 27 फेब्रुवारी रोजी काही भटक्या कुत्र्यांनी तो मृतदेह उकरून बाहेर काढला. त्यानंतर परिसरात सनसनाटी पसरली होती. याप्रकरणी पोलिसांनी 6 मार्चला आरोपी नीरज सिंह आणि त्याचा मित्र ओम प्रकाशला अटक केली आहे. यांच्या अटकेनंतर एसपी संजीव लिंडा यांनी पत्रकारांना सांगितलं की, संबंधित मृत मुलीचा जुना प्रियकर गुजरातमध्ये असून त्याच्या या घटनेशी काहीही संबंध नाही. पोलिस या घटनेचचा उर्वरीत तपास करीत आहेत.