कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरील पतमापन संस्था एस.अँड.पी ने (स्टँडर्डस अँड पूवर्स) चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर (सकल राष्ट्रीय उत्पादन) दहा टक्क्यांच्याही खाली येण्याचा अंदाज वर्तवला आहे. याआधी एस.अँड.पी ने ११ टक्के जीडीपी दराचे भाकीत वर्तवले होते. मात्र आता विकासदर ९.८ टक्क्यांपर्यंत खाली येईल, असे म्हटले आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील कोरोनाचे संकट वाढण्यास सुरुवात झाली होती. गेल्या दोन महिन्यांत कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून महाराष्ट्रासह विविध राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका कृषी, सेवा आणि निर्मिती क्षेत्राला बसला आहे. तर लॉकडाऊनमुळे देशाच्या मोठ्या भागात जनजीवन ठप्प पडले. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयावह ठरली आहे.
कोरोनाचे संकट लवकर आटोक्यात आले नाही तर त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करतानाच, एस.अँड.पी ने चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर हा ११ टक्क्यांऐवजी ९.८ टक्के इतका नोंदवला जाऊ शकतो, असे नमूद केले आहे. भारताचा पतमापन दर्जा ट्रिपल बी निगेटिव्ह असल्याचे सांगतानाच परिस्थिती आणखी खालावली तर दर्जाची पुन्हा समीक्षा करावी लागू शकते, असेही अहवालात म्हटले आहे. कोरोना संकटामुळे देशाची वित्तीय तूट तब्बल १४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सरकारचे कर्ज जीडीपीच्या तुलनेत ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
दरम्यान आघाडीची ब्रोकरेज फर्म ‘बार्कलेज’ ने देखील भारताच्या जीडीपी दराचा अंदाज कमी केला असून चालू आर्थिक वर्षात हा दर ११ टक्क्यांऐवजी १० टक्के होऊ शकतो, असे सांगितले आहे.