नागपूर : आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाच्या शांतीप्रिय विचारांची गरज आहे. बुद्धाच्या या विचारांची प्रेरणा घेऊनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकेरांनी दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांच्या सोबतीने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बाबासाहेबांना अपेक्षित समानता प्रस्थापित करण्यासाठी, बाबासाहेबांचे विचार सर्वत्र रुजविण्यासाठी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्रमांक ३७ मधील परसोडी येथे निर्मित तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सौंदर्यीकरण चे रविवारी (ता.३) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर सत्ता पक्षनेते संदीप जोशी, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, अग्निशमन समिती सभापती लहुकुमार बेहते, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका सोनाली कडू, पल्लवी शामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, माजी उपमहापौर राजाभाऊ लोखंडे, माजी कुलगुरु योगानंद काळे, राजीव हडप, रमेश भंडारी, विवेक तरासे, छोटू बोरीकर, अनुसया गुप्ता, संजय उगले, रेणुका उगले, वर्षा चौधरी, नितीन महाजन, उमेश कडू, सुरेंद्र पांडे, आशिष पाठक, सचिन कराडकर, राजेश गायकवाड, पंकज महाजन उपस्थित होते.
बाबासाहेबांना अभिप्रेत समानता प्रस्थापित व्हावी या हेतूने परसोडी येथे उभारण्यात आलेल्या तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुंदर स्मारकाबद्दल नगरसेवक व क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने यांचे ना.नितीन गडकरी यांनी यावेळी अभिनंदन केले.
बाबासाहेबांचे कार्य, त्यांचे विचार येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहेत. यासाठी त्यांच्या स्मारकाचे विकास करण्यासाठी शासनाने सदैव पुढाकार घेतला आहे. दीक्षाभूमीचा विकास व सौंदर्यीकरणासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला. केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून दीक्षाभूमीसह चिचोली येथील बाबासाहेबांचे वस्तुसंग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेसची विकास कामे करण्यात येत आहेत. लंडन येथे बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले घर शासनाने खरेदी करून त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आले. याशिवाय दिल्ली येथील ज्या निवासस्थानी बाबासाहेबांचा मृत्यू झाला ते घरही स्मारक म्हणून विकसीत करण्याबाबत निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुंबई येथील इंदू मिलची जागाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. बाबासाहेब वैश्विक गुरू आहेत व त्यांचे विचार, कार्य जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी बाबासाहेबांची स्मारक जागतिक दर्जाचीच निर्माण व्हावीत केंद्र व राज्य शासन सदैव कटिबद्ध आहे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
प्रास्ताविकात क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सौंदर्यीकरणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन विमलकुमार श्रीवास्तव यांनी केले तर आभार नितीन महाजन यांनी मानले.
अधिक वाचा : कर्मवीर बाबू हरिदास आवळे यांच्या पुण्यतिथी निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन