नागपूर : नागपूरच्या दक्षिण-पश्चिम भागातील बारासिग्नल या दलितबहुल वस्तीतील सौंदर्यीकरण केलेली विहीर ‘गांधीजींची विहीर’ या नावाने आेळखली जाते. महात्मा गांधीजींनी ९० वर्षांपूर्वी देशभरात राबवलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याची साक्ष देत ही विहीर आजही चांगल्या स्थितीत आहे. आता घरोघरी नळ आल्याने मागील काही वर्षांत विहिरीतील पाण्याचा वापर बंद झाला आहे. मात्र, आजही या वस्तीतील दलित बांधवांमध्ये या विहिरीबद्दल जिव्हाळ्याची भावना आहे.
सन १९३३ मध्ये सेवाग्रामला जाण्यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी नागपुरात आले होते. अचानक त्यांनी तत्कालीन दक्षिण नागपूरच्या बारासिग्नल या दलित वस्तीला भेट दिली. त्या वेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पट्टाभी सीतारामय्या, स्थानिक अनुयायी पूनमचंद रांका, बॅरिस्टर अभ्यंकर ही मंडळी होती. तेथील लाेकांशी स्वच्छतेबाबत चर्चा करीत असताना त्यांना एक धक्कादायक बाब समजली. पिण्याच्या पाण्यासाठी लाेकांना चक्क नाल्याचे पाणी वापरावे लागत हाेते. पिण्यासाठीचे पाणी हे लाेक उकळून पीत तर अंघोळ किंवा इतर कामांसाठी त्याच अशुद्ध पाण्याचा वापर सुरू होता. या प्रकारामुळे व्यथित झालेल्या गांधीजींनी वस्तीत विहीर तयार करण्याचा विचार बोलून दाखवला. स्थानिक अनुयायांसह स्वातंत्र्यसैनिक बजरंग ठेकेदार, जंगलुजी बढेल आणि तत्कालीन नागपूर म्युनिसिपल कमिटीने प्रतिसाद देत विहिरीच्या खोदकामासाठी पुढाकार घेतला. पैशासाठीही अनेकांनी हातभार लावला. रांका आणि अभ्यंकर कुटुंबातील महिलांनी तर आपल्या सोन्याच्या चार बांगड्या काढून दिल्या. अशा सर्वांच्या सहकार्याने विहिरीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर ८ नोव्हेंबर १९३३ रोजी गांधीजी पुन्हा नागपुरात आल्यावर त्यांच्याच हस्ते विहिरीचे उद््घाटन पार पडले.
या विहिरीच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करणारे माजी आमदार भोला बढेल सांगतात, उद्घाटन करताना गांधीजींनी स्वत: विहिरीतील पाणी वस्तीतील काही बांधवांना पाजले, असे आमचे पूर्वज सांगतात. त्यानंतर गांधीजींनी अनेकदा या वस्तीला भेट दिली. वस्तीतील साफसफाईचे कार्य स्वत:च्या हस्ते केले. गांधीजी या वस्तीतील मुलांना स्वत: अंघोळ घालून स्वच्छता आणि आरोग्याचा सातत्याने संदेश देत…’
मध्यंतरी या विहिरीच्या जीर्णोद्धाराचा विषय पुढे आला. विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तिचे संवर्धन, डागडुजी, सौंदर्यीकरण आवश्यक होते. तत्कालीन आमदार भोला बढेल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. तत्कालीन खासदार सुनील दत्त, उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना त्यांनी नागपुरात विहिरीचे दर्शन घडवले. १९९६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, पालकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विहिरीच्या सौदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. काम पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री जोशी पुन्हा उद््घाटनासाठी आले होते. या विहिरीचे सौंदर्यीकरण आजही बऱ्याच प्रमाणात शाबूत आहे.
विहिरीबद्दल आजही स्थान : माजी आमदार भाेला बढेल
वस्तीत नळ आल्याने मागील काही वर्षांपासून विहिरीतील पाण्याचा वापर बंद झाला आहे. मात्र विहिरीची नियमित साफसफाई होते. गांधी जयंती, पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला विहिरीजवळ कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ही विहीर गांधीजींनी स्वत: आमच्या समाजासाठी बांधली. आज अस्पृश्यतेचा कलंक हद्दपार झाला असला तरी आमच्या पूर्वजांनी सोसलेल्या हालअपेष्टांची आठवण या विहिरीच्या निमित्ताने होते. त्यामुळेच आम्हाला या विहिरीबद्दल विशेष आस्था वाटते.. असे माजी आमदार भोला बढेल सांगतात.
अधिक वाचा : नागपुर के श्री. राजेंद्र जायस्वाल ने गणतंत्र दिवस पर तिरंगे के साथ इतिहास रचा !