नागपूर: नागपूर मेट्रोला अर्थपुरवठा करणाऱ्या फ्रान्स आणि जर्मनीचे शिष्टमंडळ प्रकल्पाची अद्ययावत माहिती घेण्यासाठी नागपुरात दाखल झाले आहे. तीन दिवस प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी के. एफ. डब्लू. जर्मनी आणि ए. एफ. डी फ्रान्स सरकारच्या अंतर्गत विकास बँकेतर्फ नेमण्यात आलेली समिती तीन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आली आहे. १० नोव्हेंबर २०१९ रोजी या चमूने नागपूर मेट्रोच्या प्रवासी मार्गाचे निरीक्षण केले. व्यावसायिक स्टेशन्सची पाहणी केली. प्रतिनिधी मंडळाने रविवारी नागपूर मेट्रोतून प्रवास करत प्रकल्पांची माहिती घेतली. के. एफ. डब्लू. आणि ए. एफ. डी. या दोन्ही वित्तीय संस्थांनी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या संयुक्त देखरेख मिशनअंतर्गत हा दौरा आयोजित केला. एफ. डब्ल्यू. जर्मनीचे प्रकल्प व्यवस्थापक क्रिस्टियन वोस्लर, तांत्रिक तज्ज्ञ पीटर रूनी, जुटा वोल्मर, सविता राम, स्वाती खन्ना, ब्रुनो बोसल, सिल्वेन बर्नाड, रजनीश अहुजा यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. यावेळी महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर, वित्त संचालक एस. शिवमाथन, कार्यकारी संचालक अनिल कोकाटे आदी उपस्थित होते.
कामाचे सादरीकरण
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची अंमलबजावणी कशी सुरू आहे, याची माहिती घेणार आहे. तांत्रिकी, वित्तीय आणि इएसएचएस दृष्टीकोन तपासण्यात येईल. सोमवारी मेट्रो हाऊस येथे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांची भेट घेतली. महामेट्रोच्या आतापर्यंतच्या कामाचे सादरीकरण यावेळी शिष्टमंडळापुढे करण्यात आले. जर्मनी आणि फ्रान्सच्या शिष्टमंडळाने महामेट्रोद्वारे, राबविण्यात येत असलेल्या मल्टी मॉडल इंटिग्रेशन, ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी), कॉमन मोबिलीटी कार्ड, फर्स्ट अॅण्ड लास्ट माइल कनेक्टिव्हिटी, फिडर सर्व्हिस तसेच सोलर उर्जा प्रकल्पाची माहिती दिली.