कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा!

Date:

नागपूर: शहरात कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. हा धोका लक्षात घेता कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृतदेहाच्या विल्हेवाटी संदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्गदर्शक तत्वांबाबत आदेश जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन व्हावे याकरिता त्यांनी पोलिस आयुक्तालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) प्रशासनाला पत्रही दिले आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यातच कोरोनाग्रस्त मृतदेहापासून होणारा संसर्ग टाळणे हे सर्वात महत्वाचे आहे. यासंबंधी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यानुसार मृतदेहाला कुणीही स्पर्श करू नये. मृतदेहावर अंत्यविधी करताना पाच पेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये. वरील दोन्ही नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता संबंधित रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी. मृतदेहाला कुणी स्पर्श केले नाही आणि अंत्यविधीला पाचपेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत, याची खातरजमा झाल्यानंतरच मृतदेह नातलगांना सुपूर्द करणे. अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.

शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वयं सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. मृतदेहाच्या विल्हेवाटी संदर्भात वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होणे गरजेचे आहे. याबाबत काटेकोर कार्यवाही करिता आयुक्तांतर्फे पोलिस प्रशासन आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला आदेश देण्यात आले आहे.

Also Read- सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील सीमा सिल: आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर तात्काळ कारवाई

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related