नागपूर : युवकांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाला चालना देण्यात येत आहे. तसेच विविध महामंडळाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या संधीचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्व. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित फॉर्च्युन फाऊंडेशनच्या ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’च्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दळणवळण, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, महापौर श्रीमती नंदा जिचकार, जि. प. अध्यक्ष श्रीमती निशा सावरकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील, आमदार सर्वश्री. नागो गाणार, गिरीश व्यास, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, माजी खासदार दत्ता मेघे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
फॉर्च्यून फाऊंडेशनने पाच वर्षापूर्वी सुरु केलेला युथ एम्पॉवरमेंट समिट बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळवून देणारा एक उत्तम फोरम तयार करण्यात आला. आता हाच फोरम विदर्भात ब्रँड तयार झाला आहे. युथ एम्पॉवरमेंट समिटने युवा सशक्तीकरणाला चालना दिली, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी आ. प्रा. अनिल सोले यांनी नेमका हाच धागा पकडून विदर्भातील सुशिक्षित बेरोजगार आणि रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांमध्ये संवादाचा सेतू बांधण्याचे काम केले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भारत हा युवकांचा देश असून, सध्या भारतीय लोकसंख्येचे सरासरी वयोमान 27 वर्षे असून, त्यांना रोजगार दिल्यास हीच लोकसंख्या देशाच्या विकासाची गती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. भारतीय अर्थव्यवस्था ही चीनपेक्षा जास्त वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे रोजगार हवा असणारे आणि रोजगार देणा-यांमध्ये ‘येस’ने पूल बांधण्याचे काम केले आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युथ एम्पॉवरमेंट समिटच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रा. अनिल सोले यांचे कौतुक केले. विदर्भात नैसर्गिक संसाधने विपुल प्रमाणात असून, येथे नवनवीन उद्योग उभारणीला आवश्यक तो कच्चा माल मोठ्या प्रमाणात असल्याचे रोजगार वाढीस अनुकूल वातावरण आहे.
उद्योगउभारणीसाठी आवश्यक असणारी वीजही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वस्त वीज देण्यासाठी डिफरेन्शीएल टँरीफ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विदर्भात सर्वात कमी दराने वीज उपलब्ध करुन दिल्यामुळे उद्योग येत आहेत. त्यामुळे येथे रोजगाराची सर्वात मोठी संधी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देशांमधील सर्व राज्यांमधून महाराष्ट्रात सर्वात मोठी रोजगाराची संधी असल्याचे इपीएफओच्या ऑनलाईन अकाउंट नोंदणीवरुन लक्षात आले आहे.
कारण देशभरात इपीएफओच्या अकांऊंटची संख्या 80 लाख असून, त्यातील 25 टक्के अकाऊंट हे एकट्या महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांचे असल्याचे नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून समोर आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. गेल्या काही काळात राज्यातील तीन लाख तरुणांना कौशल्य विकासातून रोजगार मिळाला आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांमध्ये हजारो तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम फॉर्च्यून फाऊंडेशनने केले आहे आणि आजही करत आहेत. बेरोजगारी देशातील प्रमुख समस्या असून, नोक-यां देण्यावर मर्यादा आहेत.
रोजगार कसे निर्माण होतील, यावर लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या विशेष लक्ष देण्यामुळे मिहानमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. सध्या विदर्भातील मिहानमध्ये 50 हजार रोजगार मिळवून देण्याचे लक्ष्य असून, त्यापैकी 27 हजार तरुणांना रोजगार दिला आहे. येत्या वर्षात 50 हजार युवकांना रोजगार मिळेल. पायाभूत सुविधांची वाढ करताना रस्त्याची कामे सुरु आहेत. त्यातून विकासाचा वेग प्रचंड वाढत आहे. त्यामुळे येथील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असला तरी त्यांनी रोजगार देणारे व्हा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युवकांना केले.
विदर्भात सर्व प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे उद्योगनिर्मिती आणि रोजगारही मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नामुळे येत्या काही दिवसांमध्ये नागपुरात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरु होत असून, संत्रानगरी तसेच टाइगर कँपिटल असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनासही चालना मिळणार असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
नवनवीन तंत्रज्ञानामुळेही रोजगार निर्मिती होणार असल्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, असा आशावाद श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात मेट्रो, ड्रा़यपोर्ट, सिंचनासाठी पाणी उपलब्ध, विमानतळ, आयआयआयटी, आयआयएम, लॉ युनिव्हरसीटी आहे. त्यामुळे विदर्भातील विकासाचा वेग प्रचंड वाढला असल्याचे सांगून गडकरी यांनी व्यावसायिकतेकडे लक्ष देऊन नवनवीन टेक्नॉलॉजी आणून उद्योग उभे राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यावेळी लक्ष्मणराव आयटीआयला तंत्रज्ञान विद्यापीठ बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्यास सांगितले. आजापर्यंत साडेनऊ लाख कोटी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून वित्तपुरवठा करण्यात आला असल्याचे सांगितले. देशातील 22 लाख युवकांना वाहतूक क्षेत्रात रोजगार मिळाला.
मात्र, मध्यंतरी त्यांच्याकडे विनावाहक कारचा प्रस्ताव आला होता, असे सांगून गडकरी यांनी विनावाहक कार देशात आणून बेरोजगारी वाढेल, यामुळे त्यांनी तो प्रस्ताव नाकारल्याचे सांगितले. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योगांना चालना देऊन स्थानिकांना रोजगार मिळेल, याकडे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. तसेच नुकत्याच राज्य मंत्रिमंडळाने नॅरो गेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मुंबई मेट्रो आणि लोकलच्या धर्तीवर ब्रम्हपुरी – उमरेड- पवनी – रामटेक – मौदा- वर्धा – भंडारापर्यंत मेट्रो तथा ब्रॉडगेज रेल्वेने वाहतूक होईल आणि या भागाचा प्रादेशिकस्तरावर विकास होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
युथ एम्पॉवरमेंट समिट कार्यक्रमोच आयोजन नागपूर येथील स्व. वसंतराव देशपांडे सभागृहात आज फॉर्च्यून फाउंडेशन, जिल्हाधिकारी नागपूर, इसीपीए, नागपूर महानगरपालिका द्वारा करण्यात आले होते. उद्यमशील युवकांच्या महामेळाव्यात रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही समिट तीन दिवस चालू राहणार आहे.
या युथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये जवाहरलाल नेहरु पेार्ट ट्रस्ट, वेस्टर्न कोल लिमिटेड, मॉईल, नागपूर मेट्रो, कौशल्य विकास विभाग, मिहान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, उद्योग विभाग, सामाजिक न्याय विभाग, पर्यटन विभाग, नेहरु युवा केंद्र, नँशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मेढा, महा ऊर्जा, महागँस, दिनदयाल कौशल्य योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका, मनपा, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, बार्टी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, गोयल गंगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आदिंचे स्टॉल्स वसंतराव देशपांडे सभागृह परिसरात लावण्यात आले आहेत.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. तसेच रोजगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना प्रमाणपत्र, महिला बचत गटांनाही धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते युथ एम्पॉवरमेंट समिट आणि वृक्षदिंडीच्या सीडींचे विमोचन करण्यात आले.
आ. प्रा. अनिल सोले यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील 106 कंपन्या सहभागी झाल्या असून, त्यात नागपूरच्या 44 कंपन्याचा सहभाग असल्याचे सांगितले. या मेळाव्यातून एअर इंडियासह विविध एअरलाईन्स कंपन्यामध्ये 193 मुलांना रोजगार मिळाला असल्याचे सांगितले. येत्या तीन दिवसात 22 सेमिनार होणार असून, आतापर्यंत अडीच हजार युवकांना रोजगार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रेणुका देशकर यांनी केले.
अधिक वाचा : मराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध -मुख्यमंत्री