नागपूर : क्षुल्लक कारणावरून पाच जणांनी युवकाला दगडाने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी रात्री जगनाडे चौकातील हिना बारसमोर घडली. याप्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली आहे. राहुल कृष्णाजी धकाते (वय २८, रा. रमना मारोती), असे जखमीचे तर अमन राजेश जिवने (२२), उद्देश ऊर्फ दादू सूरज पारसी (२१), प्रीतम अशोक लोखंडे (१९) व अभिजित ऊर्फ आभी रामाजी काळे (२२, सर्व रा.नंदनवन झोडपट्टी), अशी अटकेतील हल्लेखोरांची नावे आहेत. विक्की विजय डहाके हा फरार आहे. राहुल याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याचा मोबाइल कव्हर विक्रीचा व्यवसाय आहे. दिवाळीसाठी त्याची पत्नी माहेरी गेली होती. पत्नीला बस थांब्यावर सोडल्यानंतर तो डॉ. धीरज श्यामराव टेकाडे (३५, रा. चिटणीसनगर,) व नितीन इंगळे यांच्यासह जगनाडे चौकात आला. तिघेही मोटरसायकल पार्क करून हिना बारमध्ये गेले. रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास तिघे बारमधून बाहेर आले. नितीन इंगळे हा अन्य मित्रासह घरी गेला. धीरज हे पार्क केलेल्या मोटरसायकलवर बसून राहुल याची वाट बघत होते. यावेळी पाच जण मोटरसायकलजवळ उभे होते. ते दारु प्यायले होते. त्यांनी धीरज याच्यासोबत वाद घातला. याचवेळी राहुल तेथे आला. त्याने जाब विचारला. पाच जणांनी राहुल याला पकडून मारहाण करायला सुरुवात केली. दगडाने त्याचे डोके ठेचले. रक्ताच्या थारोळ्यात राहुल खाली कोसळला. हल्लेखोर पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. गुन्हे शाखेचे सहायक सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, उपनिरीक्षक मंगला मोकाशे, हेडकॉन्स्टेबल शत्रूघ्न कडू, शैलेश ठवरे, सुरेश हिंगणेकर, अनिल दुबे, श्याम कडू, अतुल दवंडे, मिलिंद नारसन्ने व शरीफ शेख हेही तेथे पोहोचले. त्यांनी हल्लेखोरांबाबत माहिती घेऊन त्यांचा शोध सुरू केला. चौघांना अटक केली. अमन, दादू व अभिजितविरुद्ध यापूर्वीही प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे.
अधिक वाचा : मॉर्निग वॉकला गेलेल्या 3 शिक्षकांना बोलेरा गाडीने उडवले; दोघांचा जागेवरच मृत्यू