नागपुर :- पूर्व नागपुरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पारडी-भरतवाडा-पुनापूर मध्ये होत असलेल्या नियोजनबद्ध विकासाचे दोन टप्पे ठरवा. पहिल्या टप्प्यत नागपूर सुधार प्रन्यासची जागा, खासगी जागा व अन्य जागांवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचे बांधकाम पूर्ण करा. उत्तम दर्जाची घरे बांधून तयार करा. या घरांमध्ये नागरिकांना जागा दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्या भागाचा नियोजनबद्ध विकास करा, अशी सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या डॉ. पंजाबराव स्मृती सभागृहात रविवारी (ता. १२) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर व मनपाच्या विशेष प्रकल्प समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके, सडक परिवहन मंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सुधीर देऊळगांवकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, जिल्हाधिकारी तथा नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती अश्विन मुदगल, मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेशकुमार, नागपूर मेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेशकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे व प्रकल्पाशी संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा घेताना ना. नितीन गडकरी म्हणाले, पूर्व नागपुरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होत असलेल्या नियोजनबद्ध विकासाअंतर्गत कुणीही बेघर होणार नाही किंवा कुणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. नियोजन आराखड्यानुसार जे बाधित होणार आहे त्यांना सर्वप्रथम राहण्यासाठी घरे उपलब्ध करून द्या. ही घरे उच्च प्रतीची असायला हवी. या घरांमध्ये सोलरवर वीज, वॉटर हिटर आणि एलईडी दिवे लावा.
तांत्रिक आणि आर्थिक अर्हतेवर याबाबत निविदा मागवा, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या. हा संपूर्ण प्रकल्प दोन टप्प्यात करण्याचेही त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात घरांची बांधणी आणि दुसऱ्या टप्प्यात नियोजनानुसार विकास असे कार्य करण्यास ना. गडकरी यांनी सांगितले. घरांचे बांधकाम करण्यासाठी प्रथम ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंसी’ नेमा. सुरक्षा भिंत, अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी फ्लाय ॲशचा वापर करा. सार्वजनिक कार्यक्रमासाठी समाजमंदिर तयार करा.
वॉटर रिसायकल प्लान्ट तयार करा. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून त्यातील पाणी शौचालय आणि उद्यानांकरिता द्या. या भागात उत्तम बाजार तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले.
*क्रीडा धोरण तयार करा!*
गणेश नगर स्केटिंग रिंकचा आढावा घेताना ना. नितीन गडकरी यांनी खेळांच्या मैदानांचा वापर व्यावसायिक दृष्ट्या करू नका, असे निर्देश दिले. नागपूर शहरातील कुठलीही मैदाने जर कुठल्या संस्थेला उपयोगादेत असेल तर त्या मैदानाची देखभाल, विद्युत खर्च संस्थेने करावा. मैदाने संस्थांना दिली याचा अर्थ त्या मैदानावर इतरांना बंदी राहील, असा नाही. त्या मैदानावर त्या परिसरातील प्रत्येक मुलाला खेळायला मिळालेच पाहिजे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने एक क्रीडा धोरण तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नागपूर शहरातील मनपा, नासुप्र, वेकोलि, रेल्वे यासह अन्य सार्वजनिक उपक्रमांतर्गत असलेल्या मैदानांची यादी तयार करण्यात यावी, त्यावर कोणते खेळ खेळल्या जातात याची माहिती तातडीने तयार करून सादर करण्याचे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले. सदर, उत्तर नागपूर भागात फुटबॉलची मैदाने, दक्षिण-पश्चिम भागात बॉस्केटबॉल आणि पूर्व नागपुरात कबड्डी, खो-खो साठी मैदाने विकसित करण्याचीही सूचना त्यांनी यावेळी केली. आमदार गिरीश व्यास यांच्या अध्यक्षतेखाली नासुप्र सभापती, मनपा आयुक्त आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची समिती तयार करून याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
*कविवर्य सुरेश भट सभागृहात आर्ट गॅलरी*
नागपूर शहरातील शिल्पकार, चित्रकारांसाठी आर्ट गॅलरी निर्माण व्हावी असा प्रस्ताव माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी प्रशासनाकडे दिला होता. या प्रस्तावावर सदर बैठकीत चर्चा झाली. कविवर्य सुरेश भट सभागृहात अशा कलावंतांसाठी आर्ट गॅलरी तयार करण्याचे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी दिले.
*ग्रीन बससंदर्भात २३ ला दिल्लीत बैठक*
नागपुरात इथेनॉलवर चालणाऱ्या ग्रीन बस संदर्भात २३ ऑगस्टला नवी दिल्ली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रीन बस चालविण्यासंदर्भात सध्या येत असलेल्या अडचणी, त्यावर महानगरपालिकेची भूमिका, बस ऑपरेट करणारी कंपनी स्कॅनियाची भूमिका यावर मार्ग सदर बैठकीत काढण्यात येईल, असे ना. गडकरी म्हणाले. नागपूर शहरातील ‘आपली बस’ चालविताना येत असलेल्या अडचणीवरही तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. मनपाच्या शहर बस वाहतुकीचा तोटा महिन्याकाठी सात कोटींचा आहे.
हा तोटा कमी करण्यासाठी ४०० बसेसला सीएनजी कीट लावण्याची सूचना त्यांनी केली. प्रवासी तिकीटापोटी दररोज जमा होणारा पैसा हा संबंधित ऑपरेटरच्या खात्यात जमा करण्याची सूचनाही ना. गडकरी यांनी केली. लंडन ट्रान्सपोर्टची माहिती घेऊन त्या पद्धतीने शहर बस वाहतुकीचे संचलन करण्याचे निर्देशही ना. गडकरी यांनी दिले. शहर बस डेपोसाठी ज्या जागा आहेत त्या जागांवर ‘बस पोर्ट’चा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
*प्रत्येक झोनमध्ये तीन विरंगुळा केंद्र*
कंपनी सीएसआर फंडातून नागपुरातील मनपाच्या प्रत्येक झोननिहाय तीन विरंगुळा केंद्र तयार करण्यात येणार आहेत. अशी प्रत्येक झोनमधील तीन-तीन उद्याने निवडून ती यादी सादर करण्याचे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी दिले. आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सदर उद्यानांची यादी ना. गडकरी यांना सादर केली. नागपूर शहरात उभाऱण्यात येणारे महिला उद्योजिका भवनसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत कन्सल्टंसी नेमा आणि १ डिसेंबरपासून काम सुरू होईल याची काळजी घ्या, असेही निर्देश ना. गडकरी यांनी दिले. अजनी चौकातील क्लॉक टॉवरची देखभाल आणि सुशोभीकरण नागपूर मेट्रोने करावे, असेही निर्देश दिले.
*पट्टे वाटप तातडीने करा*
पट्टे वाटपाचा विषय प्रलंबित ठेवू नका. महापौर आणि संबंधित क्षेत्राचे आमदार यांच्या हस्ते पट्टे वाटप करा, असे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गड्डीगोदाम येथील गुरुद्वारा भूमिगत गटार योजनेमध्ये जर काही अडचणी असेल तर त्या तातडीने दूर कराव्या. रेल्वेने मधात अडसर बनू नये. या कामासाठी रेल्वे तातडीने नाहरकत द्यावे, असेही निर्देश त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे पुलाकडे जाणाऱ्या विकास आराखड्यामधील रस्त्याच्या बांधकामातही रेल्वेने आडकाठी आणू नये.
यासंदर्भात तातडीने निविदा काढण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. केळीबाग रोड आणि बाजार, यशवंत स्टेडियम ते पंचशील चौक दरम्यान प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनव्हेशन सेंटर आणि अंबाझरी ओपन थिअटर या प्रकल्पांचे सादरीकरण ना. नितीन गड़करीं यांच्यासमोर करण्यात आले. केळीबाग रोड वरील व्यावसायिकांच्या व्यावसायावर गदा येणार नाही, याची काळजी घ्या, अशी सूचना त्यांनी केली.
बैठक सुमारे तीन तास चालली. त्यात विविध विषयांवर सविस्तर चर्चा आणि नियोजन ठरविन्यात आले. सर्व विकास कामाना गती देण्याच्या सूचना ना. गड़करीं यांनी केल्या. ज्या विभाकड़ून विलंब होत आहे त्याबाबत संबंधिताना सक्त ताकीद दिली.
अधिक वाचा : ‘गिफ्ट मिल्क’ मुळे सुटणार शेतकऱ्यांसह कुपोषणाचा प्रश्न – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास