नागपूर : नागपूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आता सीएनजी बसेसची भर पडणार आहे. २ मार्च, शनिवारी सीएनजीमध्ये परवर्तित केलेल्या दोन डिझेल बसेसचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते होणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली. महापालिकेचा शहरातील रस्त्यावर चालणाऱ्या सर्व १७० बसेस सीएनजीमध्ये परवर्तित करण्याचा मानस आहे. टप्प्याटप्याने असे करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात महापालिका ५० डिझेल बसेस सीएनजीमध्ये परवर्तित करण्यात येतील. वर्षभराच्या काळात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे महापालिकेचा इंधनावर खर्च होणाऱ्या निधीत बचत होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
इथेनॉलवर चालणाऱ्या बसेसबद्दल बोलताना कुकडे म्हणाले, सध्या ग्रीन बस ऑपरेटर स्कॅनिया कमर्शियल व्हेईकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून बसेस ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. रेड बस ऑपरेटरपैकी एक असलेल्या ट्रॅव्हल टाइमकडूनही या बसेस ताब्यात घेण्यात येईल. एकदा ही प्रक्रिया पार पडल्यावर शहरात पुन्हा एकदा या बसेस धावताना दिसतील. त्याचबरोबर महापालिका स्कॅनिया कंपनीचे १० कोटींची थकबाकी लवकरच अदा करेल असेही कुकडे यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा : रामन विज्ञान केंद्र शास्त्रज्ञाचे नाव असलेले भारतातील एकमेव केंद्र