नागपूर : कोविड संक्रमणामुळे शहरात फटाका दुकान लावण्यसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत २२.६१ टक्के कमी अर्ज आले आहेत. त्यात सुरक्षा लक्षात घेता मनपा प्रशासनाने मुख्य बाजार भागात दुकाने लावण्याला बंदी घातली आहे. विशेष म्हणजे फटाका दुकान लावण्यासाठी परवानगी घेताना मालमत्ता कर भरावा लागतो. यातून मनपा तिजोरीत २३.२४ लाखाचा मालमत्ता कर जमा झाला आहे.
शहरातील प्रमुख बाजार भागात फटाका दुकानांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली. यात सीताबर्डी मेन रोड, महाल चौक ते गांधीगेट चौक, महाल चौक ते भोसला वाडा, महाल चौक ते बडकस चौक, कल्याणेश्वर मंदिर परिसर, गोळीबार चौक ते टिमकी, तीन नळ चौक ते शहीद चौक, शहीद चौक ते टांगा स्टँड, हंसापुरी ते नालसाब चौक, मस्कासाथ चौक ते नेहरू पुतळा, मारवाडी चौक, मेयो रुग्णालय परिसर, डागा रुग्णालय, मेडिकल कॉलेज परिसर, इंदोरा चौक ते कमाल टॉकीज चौक, गोकुळपेठ बाजार, सदर रेसिडेन्सी रोड तसेच गर्दीच्या व गजबजलेल्या मार्गांवर फटाका दुकाने लावता येणार नाही, याचे प्रत्येक फटाका व्यावसायिकाने पालन करावे, असे आवाहनही राजेंद्र उचके यांनी केले आहे.
५८२ व्यावसायिकांना ना हरकत प्रमाणपत्र
यावर्षी शहरातील ९ अग्निशमन केंद्रातून ५८२ व्यावसायिकांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. स्थायी दुकाने लावण्यासाठी अग्निशमन विभागाची परवानगी लागते. अग्निशमन विभागाव्दारे १ हजार रुपये शुल्क तसेच पर्यावरण शुल्क म्हणून ३ हजार आकारण्यात येत आहे. गेल्या वर्षी ७५२ दुकानांना परवानगी देण्यात आली होती. पोलीस विभागाकडून अंतिम मंजुरी व परवाना दिला जातो. १५ दिवसासाठी दुकानांना परवानगी असते. दुकानदारांना मास्क लावणे अनिवार्य आहे. दुकानाजवळ ज्वलनशील पदार्थ व वीज तार नको, पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.