नागपूर : नागपुरातील अग्निशमन व आणिबाणी सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची ‘खाकी वर्दी’ बदलणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अग्निशमन सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रमाणे आता अधिकारी पांढरा शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू पॅन्ट तर कर्मचारी आकाशी शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू पॅन्टमध्ये स्वातंत्र्यदिन पासून दिसणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ नागपूर अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचीच खाकी वर्दी होती. आता संपूर्ण महाराष्ट्रातील अग्निशमन सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसारखाच परिधान राहणार आहे.
नागपूर महानगरपालिकेतील अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ब्रिटीशकाळापासून खाकी परिधान होता. नागपूर महानगर पालिकेकडे हा गणवेश धारण करण्यासंदर्भात कसलीही नियमावली नव्हती. याकरिता विभागाने मुख्यत: अधिकारी वर्गाला खाकी रंगाचा पॅन्ट, शर्ट, खाकी पी कॅप, लाल रंगाचे बूट, लाल लेदर बेल्ट आणि कर्मचारी वर्गाला खाकी रंगाचे पॅन्ट, शर्ट, खाकी कमाण्डो कॅप, काळ्या रंगाचे बूट, काळा लेदर बेल्ट याप्रमाणे गणवेश व गणवेश साहित्य परिधान करण्यासंदर्भात २१ जून २००५ मध्ये ठराव मंजूर करवून घेतला.
पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र अग्निशमन सेवेच्या संचालकांनी ड्रील मॅन्युअल (Drill Manual) प्रकाशित करून संपूर्ण राज्यातील अग्निशमन विभागासाठी एकच युनिफॉर्म असावा याबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत. तो युनिफॉर्म पदनिहाय कसा असावा, रँक कसा असावा, याबाबत सविस्तर नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमधील अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे परिधान या ड्रील मॅन्युअलनुसार पूर्वीपासूनच होते.
नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने २० जून २०१६ च्या विशेष महासभेत ठराव क्र. २७४ नुसार गणवेशाबाबत मंजुरी घेतली. स्थायी समितीच्या १८ नोव्हेंबर २०१६ च्या ठराव क्र. ७२८ आणि १९ जानेवारी २०१७ च्या ठराव क्र. ४०२ नुसार सदर गणवेश व गणवेश साहित्य नियमावलीप्रमाणे विभागाने खरेदी करण्यास मंजुरी दिली.
त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून नागपूर महानगरपालिका अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना गणवेश प्राप्त झाले आहेत. १५ ऑगस्ट रोजीपासून नागपूर अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचारी हा गणवेश परिधान करणार असून आता संपूर्ण महाराष्ट्रातील अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख या गणवेशामुळे एक झाली आहे. अग्निशमन सेवेची कार्यप्रणाली एकसारखीच असल्याने यामध्ये एकसूत्रता असणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचा गणवेश व गणवेश साहित्य एकसारखेच असावे, असे ड्रील मॅन्युअल मध्ये नमूद केले आहे.
अग्निशमन विभाग सुसज्ज असावा यादृष्टीने नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, आयुक्त वीरेंद्र सिंह, अग्निशमन समितीचे सभापती लहुकुमार बेहते, उपसभापती वर्षा ठाकरे व सर्व समिती सदस्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याच प्रयत्नाने विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना नवा गणवेश उपलब्ध झाल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.
असा राहील गणवेश
नागपूर महानगरपालिका अग्निशमन विभागातील अधिकारी आता पांढरा शर्ट, नेव्ही ब्ल्यू पॅन्ट, नेव्ही ब्ल्यू पी कॅप, काळा लेदर बेल्ट, काळे लेदर बूट परिधान करतील. कर्मचारी वर्ग आकाशी रंगाचा शर्ट, नेव्ही ब्ल्यू पॅन्ट, नेव्ही ब्ल्यू बॅरिड कॅप, काळा लेदर बेल्ट, काळा लेदर बूट याप्रमाणे गणवेश परिधान करतील.
अधिक वाचा : तिरंगे के रंगों से जगमगाने लगा नागपुर रेलवे स्टेशन