नवी दिल्ली : दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या बोगीला आग लागली. ही ट्रेन रायवाला ते देहरादून जात असताना कांसरो स्थानकाजवळ ही घटना घडली. राजाजी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य भागात कांसरो स्टेशन येते. ज्या डब्यात आग लागली त्या कोचला वेगळं करण्यात आलं. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली. या घटनेनंतर रेल्वेमध्ये गोंधळ उडाला. घटनास्थळावर कांसरो रेंजमधील रेंजर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले. ज्वालांनी वेढलेली बोगी मुख्य रेल्वेपासून वेगळी करण्यात आली.
उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की आग लागलेल्या दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या सी-4 डब्यात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असून शताब्दी एक्स्प्रेस देहरादून स्थानकात दाखल झाली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत म्हणाले की, “दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्यात राजाजी व्याघ्र प्रकल्पाच्या कांसरो रेंजजवळ आग लागल्याची माहिती मिळाली. भगवान बद्री विशाल आणि बाबा केदार यांच्या कृपेने कोणीतीही जीवितहानी या घटनेत झाली नाही. सर्व प्रवासी सुखरुप आहेत.”