नागपूर : हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नागपुरात आलेल्या अमिताभ बच्चन यांचे अखेर शुक्रवारी चाहत्यांना दर्शन झाले. चित्रीकरणाच्या स्थळावर किंवा हॉटेलमधून येताना-जाताना बच्चन दिसले नव्हते. मात्र शुक्रवारी चित्रीकरणस्थळी जात असताना प्रवेशद्वारावर गाडीत बसलेल्या अमिताभ बच्चन यांची एक ‘झलक’ दिसताच चाहते आनंदित झाले.
‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांच्या पहिला वहिला हिंदी चित्रपट ‘झुंड’ येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाचे चित्रीकरण ते सध्या नागपूरमध्ये करत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मागील पाच दिवसांपासून बच्चन नागपुरात आहेत.
दररोज चित्रीकरणाच्या स्थळी त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे तेथे पोहोचणे शक्य होत नसल्याने चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. शुक्रवारी सकाळी चित्रीकरणाच्या स्थळी पोहोचलेल्या कारच्या काफिल्यांमध्ये एमएच-१२, एनडब्लू ६५६५ या गाडीत बच्चन बसले होते. त्यांना पाहताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
मोहननगर परिसरातील शाळेत ‘सेट’ बनविण्यात आला आहे. मात्र सुरक्षेमुळे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांनादेखील ‘बिग बी’ यांना पाहता आले नव्हते. शुक्रवारी मात्र दिग्दर्शकांनी पुढाकार घेतला व शाळेच्या काही विद्यार्थ्यांना अमिताभ यांना भेटता आले. त्यांनी यावेळी मुलांशी हातदेखील मिळविला.
अमिताभ बच्चन यांनी मानले नागपूरकरांचे आभार
अमिताभ बच्चन यांनी नुकतेच ट्वीट करून नागपूरकरांचे आभार मानले आहेत. नागपूरकरांनी मला दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा कायम ऋणी आहे या शब्दांत त्यांनी ट्वीट करत नागपूरकरांवरचे आपले प्रेम दाखवून दिले आहे. त्यांनी या फोटोसोबत नागपूरमधील हॉटेलमध्ये, लॉबीमध्ये त्यांची एक झलक पाहाण्यासाठी गर्दी केलेल्या लोकांचा फोटो देखील ट्वीट केला आहे.
T 3018 – .. and the love and affection continues .. on the streets in the lobby Hotel .. and in my heart ..thank you NAGPUR for your love .. pic.twitter.com/4UoslIgMlr
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 7, 2018
Video : Amitabh Bachchan arrives in Nagpur to shoot for Jhund