नागपूर, महामार्ग प्राधिकरणासह रस्ते विकास महामंडळाकडून 1 जानेवारी 2021 पासून वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आले असून फास्टॅग नसणार्या वाहन चालकांकडून 1 जानेवारीपासून दुप्पट टोल वसुली केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना टोलनाक्यावर न थांबता पुढे जाता येणार आहे.
देशभरातील टोल नाक्यांवर वेळ वाचविण्यासाठी फास्टॅग प्रणाली वर्षभरापूर्वीपासून बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, एकाचवेळी एवढे फास्टॅग मिळविणे आणि त्या प्रणालीतील दोष पाहून सरकारने ही मुदत काहीवेळा वाढविली होती. आता 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याची माहिती दिली.
चारचाकींपासून पुढे सर्वच वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. गेल्या वर्षभरापासून ‘फास्टॅग’ या इलेक्ट्रॉनिक टोल प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला काही राष्ट्रीय महामार्गांवर टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्वावर ‘फास्टॅग’ वापर सुरू झाला. आता 1 जानेवारी 2021 पासून सर्व टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’द्वारेच टोल वसुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. पण, प्रत्यक्षात सहा वर्षानंतर अनेक वाहनांवर ‘फास्टॅग’ नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय महामार्गांवर ‘फास्टॅग’ टोल वसुलीसाठी एक ते दोन लेन वगळता सर्व लेन राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण अनेक वाहनांना ‘फास्टॅग’ नसल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. त्यामुळे हे बंधन शिथील करण्यात आले. आता नवीन वर्षापासून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
फास्टॅग म्हणजे काय आहे?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन म्हणजेच फास्टॅगच्या माध्यमातून महामार्गावर टोल संकलित करणार आहे. फास्टॅगच्या माध्यमातून रेडियो फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारा वाहनाच्या समोरच्या काचेवर लावलेल्या फास्टॅगमधून टोल प्लाझावर थेट टोल घेतला जातो. त्यामुळे वाहनाला लेनमध्ये रांगेत थांबण्याची गरज पडत नाही. या फास्टॅगची वैधता खरेदी केल्यानंतर पाच वर्ष आहे. त्यात केवळ वेळोवेळी रिचार्ज किंवा टॉप करावा लागतो. या कॅशलेस व्यवस्थेमुळे रस्त्यावरील वाहतूक वेगात होईल. त्यामुळे 1 जानेवारी 2021 पासून वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आले.
फास्टॅगचे काय फायदे आहेत?
– प्रवेशावेळी रोख रक्कम लागणार नाही. वेळ वाचेल.
– टोल नाक्यावर न थांबता वाहन पुढे जाऊ शकेल. त्यामुळे इंधन वाचू शकते.
– फास्टॅगचे चार्जिंग आभासी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एनईएफटी, आरटीजीएस किंवा नेट बँकिंगद्वारा केले जाऊ शकेल.
– व्यवहार पूर्ण झाल्यानंतर एसएमएस येतो. फास्टॅगमधील बॅलन्स कमी झाल्यावरही एसएमस येतो.
– वाहनांचे उत्सर्जन कमी होते. कागदाचा खर्च कमी होतो. टोलची माहिती मिळाल्यामुळे या माहितीचे विश्लेषण करून वाहतूक सुधारण्यासाठी योजना तयार केल्या जाऊ शकतात.
कोणते कागदपत्रे लागतील?
फास्टॅग खरेदीसाठी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन मालकाचा पासपोर्ट फोटो, वाहन मालकाची केवायसी कागदपत्रे लागतात.
फास्टॅगमधून टोल घेतला आहे की नाही याची माहिती कशी मिळणार ?
फास्टॅग घेताना जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्यावर एसएमएसद्वारा याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर ग्राहकांना फास्टॅग दिलेल्या संस्थेच्या वेबसाइटवर सर्व व्यवहारांचा तपशील मिळतो.