नागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण शुक्रवारी महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत गुरुवारी महापालिका व नासुप्रला निर्देश दिले होते. मनपा, नासुप्रने पोलिस ताफ्यासह कारवाई करीत म्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला. म्हाळगीनगर चौकातील रिंगरोडवरून वाहनांची कायम गर्दी असते. त्यात चिकन विक्रेत्यांनी अतिक्रमण करून वाहतुकीची कोंडी केली. त्यामुळे या वर्दळीच्या चौकातून ये-जा करणाऱ्यांवर अपघाताची कायम टांगती तलवार होती. याशिवाय येथे गुंडगिरीलाही ऊत आला होता. याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिका, नासुप्रकडे तक्रार केली. परंतु, त्याबाबत कुठलीही दखल घेतली जात नव्हती.
अखेर नागरिकांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली. नागरिकांच्या मागणीवरून पालकमंत्र्यांनी चिकनची दुकाने हटविण्याचे निर्देश मनपा व नासुप्रच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासचे पथक पोलिस ताफ्यासह म्हाळगीनगर चौकात पोहोचले. यावेळी काही दुकानदारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस ताफ्यापुढे त्यांनी नमते घेतले. त्यानंतर चिकन सेंटरचे शेड, पिंजरे आदी जप्त करीत पथकाने अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला.
कारवाईत नासुप्रचे दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी अविनाश बडगे, सहायक अभियंता संदीप राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक विनोद कुमार खळगे, क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील, महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील व इत्तर अधिकारी तसेच हुडकेश्वर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतरच महापालिका व नासुप्रला जाग आली, अशी टीकाही यावेळी नागरिकांनी पथकावर केली. काल पालकमंत्र्यांनी म्हाळगीनगर भागातील सत्यम प्लाझा या इमारतीच्या बेसमेटमध्ये घाण करणाऱ्या हॉटेलवर कारवाईचे तसेच अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते.
अधिक वाचा : वाहन चालाते समय ट्रैफिक नियमों को तोड़ने पर लाइसेंस सस्पेंड: यातायात विभाग करेगा कार्रवाई