नागपूर : सहायक अभियंत्यांच्या नावाने रोजगार देण्याची जाहिरात प्रसिद्ध करून शेकडो युवकांना कबीर इन्फोटेक लिमिटेड कंपनीने फसविले असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. प्रशिक्षणाच्या नावाने या कंपनीने विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींकडून पैसे उकळले. मात्र, एक महिन्याचे वेतन दिले असून उर्वरित पैसा घशात घातल्याने खळबळ उडाली आहे. युवकांना दिलेले धनादेशही बाउन्स झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात या युवकांनी एकत्र येत घोषणा दिल्या. तसेच पोलिसांतही तक्रार दिली.
इंजिनीअर बनायचे असे स्वप्न घेऊन अनेक युवक बीईचे शिक्षण घेतात. लाखो रुपये या शिक्षणावर खर्च झाल्यानंतर एक चांगली नोकरी मिळावी यासाठी बेरोजगार युवक कंपन्यांकडे पायपीट करतात. बेरोजगार युवकांची ही नस ओळखून कबीर इन्फोटेक कंपनीने युवकांना फसविले असल्याच्या तक्रारी आता दाखल झाल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आणि पोलिसांतही या विद्यार्थ्यांनी धाव घेतली आहे. सोमवारी शेकडो युवक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धडकले. बनावट कंपनी थाटून युवकांना फसविणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी या युवकांनी केली. प्रशित बन्सोड या व्यक्तीने आपली फसवणूक केली असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर ‘मटा’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मोबाइल स्विच्ड ऑफ असल्याची माहिती मिळाली.
प्रशिक्षणाच्या नावाने उकळला पैसा
सहायक अभियंता या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. १० हजार ते २० हजार रुपयांपर्यंत वेतन देण्याचे या जाहिरातीत म्हटले होते. ‘जॉब फुलटाइम आहे’, असा उल्लेख असणाऱ्या कंपनीने युवकांना आता पुन्हा बेरोजगार केले आहे. प्रशिक्षणाच्या नावाने या कंपनीने काही युवकांकडून ३० हजार तर काहींकडून ५० हजार रुपये वसूल केले. हिंगणा एमआयडीसी परिसरात कार्यशाळा भरवून युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. मिनी फ्रिज आणि एसी निर्माण करण्याचे काम देण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते, मात्र प्रत्यक्षात टेझर गन तयार करण्याचे काम देण्यात आले. मात्र, हे कामही तात्पुरते होते. अनेकांना केवळ एक महिन्याचे वेतन देऊन उर्वरित पैसा या कंपनीने घशात घातल्याची तक्रार या युवकांनी केली आहे.
अधिक वाचा : बनावट पोलीस बनून वृद्धांना लुटणारी टोळी नागपूरात सक्रिय