नागपूर : महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने दोन तरुणांकडून सात लाख रुपये हडपले. रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी पीडितांना बनावट नियुक्तीपत्रही दिले. महापालिकेत गेल्यानंतर ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपींची बनवाबनवी उजेडात आली. त्यामुळे फसगत झालेल्यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
कल्पना रामप्रसाद झोडापे (वय ५०), पवन रामप्रसाद झोडापे (वय २८), अनंत कांबळे (वय ४५), अमिन अनंत कांबळे (वय २८, सर्व रा. रामेश्वरी, नागपूर) आणि अमित व्ही. जोग (वय ३०, रा. साई मंदिरजवळ वर्धा रोड) अशी फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपींची नावे आहेत.
या सर्व आरोपींनी एलसन नरेंद्र आंबिलडुके तसेच विलास सातपुते या दोघांना दोन वर्षांपूर्वी नोकरीचे आमिष दाखवले. आमची महापालिकेत सेटिंग असून आम्ही कुणालाही नोकरी लावून देतो, अशी आरोपींनी थाप मारली. त्यांच्यावर विश्वास ठेवून एलसनचा भाऊ भूषण तसेच विलासचा भाऊ चेतन या दोघांना महापालिकेत लिपिकाची नोकरी लावून देण्यासाठी २ जानेवारी २०१६ ते १० डिसेंबर २०१६ या कालावधीत या दोघांकडून प्रत्येकी साडेतीन लाखप्रमाणे एकूण सात लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांना महापालिकेत नियुक्तीचे बनावट पत्र आणि ज्यांची नियुक्ती झाली, अशा उमेदवारांची यादी दिली. हे पत्र घेऊन भूषण आणि चेतन महापालिकेत गेले असता ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले.
चेकही बाऊन्स झाले
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने एलसन तसेच विलासने आरोपींची खरडपट्टी काढून त्यांना आपली रक्कम परत मागितली. पोलिसांत तक्रार करण्याचीही धमकी दिली. त्यामुळे आरोपी कांबळे पिता-पुत्र तसेच कल्पना झोडापे यांनी एलसन तसेच विलासला एक ५० हजारांचा तर दुसरा १ लाख, ४० हजारांचा चेक दिला. मात्र, नमूद तारखेत आरोपींच्या बँक खात्यात रक्कमच नसल्याने ते चेक बाऊन्स झाले. तेव्हापासून वारंवार पैशाची मागणी करूनही आरोपींनी रक्कम परत न केल्यामुळे अखेर एलसन आणि विलासने यशोधरानगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी केली जात आहे.
अधिक वाचा : नागपूर रेल्वेस्थानकावर दारूची तस्करी, आरोपीस अटक