नागपूर : रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून बंटी-बबलीसह चार जणांनी बेरोजगार युवकाची साडेअकरा लाखांनी फसवणूक केली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी बंटी-बबलीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निकिता मेश्राम, सुमित मेश्राम, राज यादव, धीर खुराण,अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. २०१५ मध्ये निखिल दत्तूजी ठाकरे (वय २८ ,रा. राजेश्वरनगर,गोधनी) याची निकिता व सुमितसोबत ओळख झाली. ‘भारतीय रेल्वेत टीसीची पदे रिक्त असून, तुला नोकरी लावून देतो,’ असे आमिष दोघांनी त्याला दाखविले. त्याच्याकडून वेळोवेळी अकरा लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर निकिताने त्याची धीर खुराणासोबत ओळख करून दिली. मार्च २०१६ मध्ये धीरने निखिलला दिल्ली येथे बोलाविले. यावेळी निखिल याची अन्य पाच बेरोजगार युवकांसोबत ओळख झाली. त्यांनाही नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने दिल्ली येथे बोलाविण्यात आले होते. राज यादव याच्याकडे काम सोपविले आहे. तो काम करून देईल, तुम्ही ८ सप्टेंबर २०१६मध्ये पुन्हा दिल्लीला या, असे खुराणा याने निखिल याला सांगितले. यावेळी खुराणा याने निखिल व अन्य युवकांकडून शैक्षणिक प्रमाणपत्र घेतले. सप्टेंबर महिन्यात निखिल याला बोलाविणे आले नाही. त्याने राज याच्या मोबाइलवर संपर्क साधला. मोबाइल बंद होता. अखेर निखिल याने गणेशपेठ पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपीस अटक