नवी दिल्ली : टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकले आहे.
एलन मस्क यांची संपत्ती 188 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची एकूण संपत्ती 187 अब्ज डॉलर्स आहे. टेस्लाच्या शेअर किंमतीत सतत वाढ झाल्यामुळे एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. एलन मस्क हे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकून ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्समध्ये अग्रस्थानी पोहोचले आहेत. जगातील 500 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
2017 पासून जेफ बेजोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनल्यानंतर एलन मस्क यांनी आपल्या शैलीत ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. एका ट्विटर युजर्सला रिप्लाय देताना एलन मस्क म्हणाले,”किती विचित्र गोष्ट आहे”.
गेल्या 12 महिन्यांचा आढावा घेतल्यास हा काळ एलन मस्क यांच्यासाठी खास ठरला. मागील वर्षी त्यांच्या वार्षिक संपत्तीत तब्बल 150 अब्ज डॉलर्सने वाढ झाली. आतापर्यंत ही सर्वाधित वेगाने झालेली वाढ ठरत आहे. संपत्तीत झपाट्याने वाढ होण्यामागे टेस्लाच्या शेअरमध्ये आलेली अनपेक्षित तेजी हे मुख्य कारण आहे.