नागपूर : नाकाबंदीदरम्यान मद्यपीने पोलिसाच्या अंगावर मोटरसायकल नेऊन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वर्धा मार्गावरील मिहान उड्डाणपूल परिसरात घडली. हेमराज थोपटे असे जखमी हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून मोटरसायकलचालकाला अटक केली आहे. केतन किशोर झाडे (रा. खापरी) असे अटकेतील चालकाचे नाव आहे.
थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तासाठी सोनेगाव पोलिस स्टेशनमध्ये तैनात हेडकॉन्स्टेबल हेमराज थोपटे , शिपाई नरेंद्र भरतराव यादव, सचिन व त्यांचे सहकारी मिहान भागात ड्रंकन ड्राइव्हची कारवाई करीत होते. एमएच-४०-एडी-६४८२ या क्रमांकाच्या मोटरसायकलने केतन जात होता. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा इशारा केला. त्याने मोटरसायकल थेट हेमराज यांच्या अंगावर चढवली. हेमराज व केतन खाली पडले. त्यानंतर मद्यधुंद केतनने पोलिसांसोबत वाद घातला. या घटनेत हेमराज यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून केतनला अटक केली. तो खासगी कंपनीत काम करतो.
अधिक वाचा : पोलिसांना ‘मर्डर’ झाल्याचा फोन करून आत्महत्या