नागपूर : बॉलीवूडचे ‘शहंशाह’ बिग बी अमिताभ बच्चन सध्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाच्या निमित्ताने राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये शूटींगच्या कामात व्यस्त आहेत. त्यांनी अन्य कोणालाही आपली वेळ दिलेली नाही.
असे असताना भाजपच्या कार्यक्रमात डुप्लिकेट अमिताभ बच्चन आणून पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न भाजपचे दक्षीण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी केला आहे. भाजप आमदारांनी ‘कोहळा’ दाखवून आवळा दिला, अशी चर्चा सुरू असून आमदाराचं हसं झाल्याचं चित्र आहे.
नागपूरकरांना खऱ्याखुऱ्या अमिताभ बच्चनला भेटायचे आहे. मात्र त्यांनी चित्रपटाच्या शूटींगमुळे कोणालाही वेळ दिलेला नाही. त्यामुळे भाजपच्या सीएम चषकाच्या कार्यक्रमात अमिताभ ऐवजी डुप्लिकेट अमिताभना आणून लोकांचं लक्ष खेचून घ्यायचं असा प्रयत्न आमदार कोहळे यांनी केला. गुरुवारी सायंकाळी क्रीडा स्पर्धेचा समारोप होता. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना डुप्लिकेट बच्चनच्या हस्ते पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
कोहळे यांनी डुप्लिकेट बच्चन यांच्या हस्ते कौतुक करून घेतले. मात्र झालं उलटंच ‘दुधाची तहान ताकावर’ अशी कूजबूज नागपुरात सुरू झाली. त्यांनी स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याच्या प्रयत्नात स्वत:चं आणि पक्षाचं हसं करून घेतलं अशाच प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, कार्यक्रमाला भाजपचे आमदार सुधाकर देशमुख, आमदार अनिल सोले हे देखील उपस्थित होते.
Video : Amitabh Bachchan arrives in Nagpur to shoot for Jhund