भूताच्या भीतीने पाच मुलांसह महिलेची विहिरीत उडी

Date:

भावनगर – भूतपिशाच्चाच्या भितीने एका महिलेने आपल्या पाच मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये संबंधित महिला आणि तिची एक मुलगी यातून बचावले आहेत. मात्र, इतर ४ मुलांचा मृत्यू झाला आहे. संबंधित महिला ही शेतमजूर असून तिचे कुटुंब बर्‍याच काळापासून आर्थिक विवंचनेत होते. गुजरातमधील भावनगर जिल्हय़ातील पंच पिपला गावात ही घटना घडली.

प्रत्यक्षदश्रींच्या माहितीनुसार, काल दुपारी गीता भलिया हिने पंच पिपला गावातील विहिरीत उडी घेतली, याची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर गीताला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. बचाव मोहिमेदरम्यान, गीता आणि तिची मोठी मुलगी धर्मिष्ठा (१०) हिला वाचविण्यात यश आले. मात्र, तिच्या ४ मुलांचा यात मृत्यू झाला. यामध्ये दोन भाऊ आणि दोन बहिणी अशा चार भावंडांचा समावेश आहे. एक वर्ष ते ८ वर्षे वय असलेली ही मुले आहेत. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर गीताने पोलिसांना सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून आमची आर्थिक स्थिती खूपच बिकट बनली आहे.आम्हाला दोन वेळेचे जेवणही मिळत नाही, त्यामुळे रात्रीची झोपही येत नाही. मला वारंवार जीव द्यावासा वाटत होता. मात्र, माझ्यानंतर मुलांच काय होईल या काळजीने पाऊल उचलले नव्हते. मात्र, त्या क्षणी भूतपिशाच्चाने पछाडल्याने आपण डोळे मिटून मुलांसह विहिरीत उडी घेतली. दरम्यान, तिच्या नवर्‍याने पोलिसांना सांगितले की, गीताला सारखे वाटत होते की, तिच्यावर कोणीतही काळी जादू केल्याने आपल्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी तिची धडपड सुरू होती. यातूनच तिने हे कृत्य केले असावे.

अधिक वाचा : पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिस आयुक्तांना ई-मेल

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related