पत्नी मावा खाते म्हणून केलेला घटस्फोटाचा अर्ज नागपूर खंडपीठाने फेटाळला

नागपूर : पती दारुडा आहे, मावा खातो, तंबाखू खातो म्हणून घटस्फोट मागणारी प्रकरणे आजवर अनेक पाहिली असतील पण पत्नी मावा खाते म्हणून घटस्फोटाचा केलेला अर्ज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला आहे. व्यसन गंभीर असले तरी या कारणाने घटस्फोट मंजूर करता येत नसल्याचे खंडपीठाने नमूद केले.

नागपूरमधील संदीप आणि सुनीता या दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या प्रकरणात नागपूर खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि पुष्पा गनेडीवाला यांनी हा निर्णय दिला. न्यायमूर्ती गनेडीवाला यांनी बाललैंगिक शोषणाबाबत दिलेल्या दोन वादग्रस्त निकालांमुळे त्या चर्चेत आल्या.

नागपूरचे रहिवासी असलेल्या या दाम्पत्याचा १५ जून २००३ रोजी विवाह झाला होता. सुनीता घरातील दैनंदिन कामे करीत नाही, क्षुल्लक कारणावरून वाद घालते, न सांगता माहेरी जाऊन एक-एक महिना राहते, आपल्याला रोज डबा करून देत नाही, असे आरोप संदीपने केले होते. तसेच तिला मावा खाण्याचे व्यसन आहे. त्यामुळे तिच्या पोटाच्या आजारावर उपचार करण्यासाठी महागडा खर्च करावा लागला, असा दावाही शंकरने घटस्फोटासाठी केलेल्या याचिकेत केला होता. मात्र हे कारण घटस्फोटासाठी पुरेसे नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. या दाम्पत्याला दोन मुले असून त्यांच्यासाठी एकत्र राहणे हिताचे आहे, असेही निकालात नमूद केले आहे.