नागपूर : कोणतीही नाविण्यपूर्ण कल्पना ही जर व्यावसायीकदृष्ट्या यशस्वी ठरली पाहिजे. त्या नवसंकल्पनेचा लोककल्याणासाठी उपयोग झाला तर त्याच्यासारखे दुसरे संशोधन नाही. नवसंशोधन हे ज्ञान आहे तर त्याचे यशस्वीरित्या अंमलबजावणीत रुपांतर म्हणजे ती देशाची संपत्ती आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर महानगरपालिका, महापौर इनोव्हेशन कौंसिलच्या वतीने नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट सभागृहात रविवारी (ता. ३) महापौर इनोव्हेशन अवार्ड वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी मंचावर खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलींद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपा सत्ता पक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपातील बसपा पक्षनेता मोहम्मद जमाल, मेअर इनोव्हेशन कौंसिलचे कन्व्हेनर डॉ. प्रशांत कडू, महापौर इनोव्हेशन अवार्डचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त नितीन कापडनीस, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका रूपा रॉय, नगरसेवक निशांत गांधी, सुनील हिरणवार उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, प्रत्येक व्यक्तीत काहीतरी नवीन करण्याची उर्मी आहे. त्याला फक्त प्रोत्साहन मिळायला हवे. महापौर इनोव्हेशन अवार्डच्या निमित्ताने महापौर नंदा जिचकार यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले यासाठी त्यांचे अभिनंदन. नागपूरात आपण अनेक नवसंकल्पनांवर आधारित प्रकल्प सुरू केले. सांडपाण्यावर प्रक्रिया, त्याचा वीज निर्मितीसाठी वापर, आयुष्य संपलेल्या डिझेल बसचे सीएनजीमध्ये रुपांतर, सुरेश भट सभागृह पूर्णपणे सौरऊर्जेवर संचालित होणे, सभागृहाच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रीक कार चार्जिंग स्टेशन निर्माण करून त्यातून मनपाने उत्पन्न घेणे, मिथेनॉलवर बस चालणे हे सर्व नवसंकल्पनेतून उदयास आलेले व्यवसाय आहेत. या नवसंकल्पना व्यवसायाच्या दृष्टीकोनातून यशस्वी ठरल्या आणि आता देशपातळीवर त्याची अंमलबजावणी होऊ लागली आहे, असे म्हणत त्यांनी नवसंशोधकांना आपल्या संकल्पना व्यावसायीक पातळीवर कशा यशस्वी होतील, याचा गुरुमंत्रच दिला.
महापौर नंदा जिचकार यांनी महापौर इनोव्हेशन अवार्डच्या यशस्वीतेचा प्रवास कथन केला. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविताना येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधण्याच्या हेतूने हापौर इनोव्हेशन अवार्डची संकल्पना मांडली गेली. देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आणि नागपूरच्या विकासात लोकसहभागाची संकल्पना प्रत्यक्षात उतरली. या उपक्रमाच्या निमित्ताने आलेल्या संकल्पना राबविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी दिला.
कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर आणि आरजे राजन यांनी केले.
हे आहेत पुरस्कार विजेते
वर्ग १२वी पर्यंतचा गट : प्रथम – स्पर्श अग्रवाल/पर्ल अग्रवाल, द्वितीय – वेदांत बावस्कर, तृतीय – संस्कृती तळवेकर, राघव तायडे, ऋषिकेश कडू.
पदवीपर्यंतचा गट : प्रथम – नंदकिशोर मोहतकर, द्वितीय – शाहरूख शेख, तृतीय – रेणुका गाजरलावार, रूपम पुसदेकर, डॅनियल कुरेशी.
पदव्युत्तर गट : प्रथम – पीयुष अंजनकर, द्वितीय – आदित्य पन्नासे, तृतीय – मनिष रहाटे, प्रमोद कुलकर्णी, रंजॉय दत्ता.
‘जाऊ दे नं वं’चा सुखद धक्का
महापौर इनोव्हेशन अवार्ड वितरणाच्या दरम्यान आयोजकांनी उपस्थितांना सुखद धक्का दिला. ज्यावेळी त्यांनी एका लहान कलावंताची ओळख देताना ‘नाळ’ चित्रपटाचा व्हिडीओ दाखविला. हा बालकलावंत प्रेक्षकात उपस्थित असल्याचे सांगताच प्रेक्षकांच्या माना वळल्या. मंचावरून ‘नाळ’मधील बालकलावंत श्रीनिवास पोफळी याने एंट्री करताच सभागृहात टाळयांचा कडकडाट झाला आणि हा बालकलावंत भाव खावून गेला.
अधिक वाचा : तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सौंदर्यीकरणाचे लोकार्पण