नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या समग्र शिक्षा अभियानांच्या समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत नुकतेच दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्यांचे वितरण करण्यात आले. शनिवारी (ता. ५) यशवंत स्टेडीयम येथील क्रीडा प्रबोधिनी हॉलमध्ये १२४ दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वितरित करण्यात आले.
मनपा आयुक्त अभिजीत बांगर व शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यक्रमाला समावेशित शिक्षण नवी दिल्लीचे मुख्य सल्लागार निशीथ वर्मा, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, समन्वयक अजय काकडे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहायक कार्यक्रम अधिकारी हरीदास डोंगरे, प्राचार्य रवींद्र रमतकर, ॲड. माधुरी दलाल आदी उपस्थित होते.
बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम २००९ या अन्वये राज्य शासन व स्थानिय स्वराज्य संस्था यांनी प्रत्येक विशेष गरजा असणा-या बालकांना वयाच्या १८ वर्षापर्यंत सुयोग्य व संचारमुक्त वातावरणात शिक्षणाची समान संधी देऊन मुख्य प्रवाहात आणणे व प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने विशेष गरजा असणा-या बालकांची राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानाअंतर्गत शाळास्तरावर तपासणी आणि तालुकास्तरीय अपंग निदान व उपचार शिबिरात वैद्यकिय तपासणी करण्यात आली.
विशेष गरजा असणा-या मतिमंद, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, अस्थिव्यंग, लॅप्रोसी क्युअर्ड, डारफिजम, मस्क्यूलर डिस्टॉफी, अॅंसिड अटॅक विक्टीम, असलेल्या विद्यार्थ्यांना स्नायु व सांद्याअंतर्गत तिव्र दोष असणा-या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्यांना त्यांच्या मापांनुसार साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. त्या अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध बॅग, स्पोर्ट्स सिटिंग, वॉकर, कृत्रीम अवयव, क्रचेस, रोलेटर इ. तसेच कर्णबधिर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र व अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल किट, ब्लाईंड स्टिक आदी साहीत्य देण्यात आले. अस्थिव्यंग तज्ज्ञ, फिजियोथेरेपिस्ट, ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट, स्पिचथेरेपिस्ट, प्रोटेस्टिक व ऑर्थोस्टिक, इंजिनियर प्रवर्ग निहाय विशेष शिक्षक व अल्मिकोच्या तज्ज्ञांमार्फंत समन्वयाने नागपूर शहरातील दिव्यांग बाधंवाचे मोजमाप शिबिर १६ ऑगस्ट २०१८ ला घेण्यात आले होते. त्यापैकी १२४ विशेष गरजा असणा-या दिव्यांग मुलांना ही साहित्य वितरीत करण्यात आली.
अधिक वाचा : प्रत्येक तक्रारीवर योग्य निर्णय होणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही