Nagpur: लाकडाचा सहा महिन्यांचा साठा दोन महिन्यांत संपला

Nagpur

Nagpur news नागपूर शहरात महापालिकेचे १६ दहन घाट आहेत. शहरात दररोच ८० ते ८५ मृत्यू होतात. परंतु कोरोनामुळे मृतकांचा आकडा वाढला आहे. २०० ते २५० अंतिम संस्कार होत आहे. बाधितावरील अंत्यसंस्कारामुळे घाटावरील भार प्रचंड वाढला आहे.

Nagpur : नागपूर शहरात महापालिकेचे १६ दहन घाट आहेत. शहरात दररोच ८० ते ८५ मृत्यू होतात. परंतु कोरोनामुळे मृतकांचा आकडा वाढला आहे. २०० ते २५० अंतिम संस्कार होत आहे. बाधितावरील अंत्यसंस्कारामुळे घाटावरील भार प्रचंड वाढला आहे. अंतिम संस्कार वाढल्याने लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे काही घाटावर दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच लाकूड साठा शिल्लक आहे. गरजेनुसार लाकूड उपलब्ध न झाल्यास अंत्यसंस्कार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

शहरातील मोक्षधाम, अंबाझरी, गंगाबाई घाट, सहकार नगर व वैशालीनगर घाटावर शवदाहिनीची व्यवस्था आहे. परंतु मृत्युसंख्या वाढल्याने येथे लाकडाचा वापर करावा लागत आहे. घाटावर दररोज २५ ते ३० टन लाकूड लागत होते. परंतु मृत्युसंख्या वाढल्याने दररोज ८० ते १०० टन लाकूड लागत आहे. कोरोना संक्रमण सर्वांकडेच असल्याने लाकूड उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत मागणीनुसार लाकूड उपलब्ध न झाल्यास लाकडाची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

अंतिम संस्कारासाठी प्रतीक्षा

मागील १५ दिवसांतच मृतकांचा आकडा दोन हजारांच्यावर गेला आहे. यामुळे लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना मृत्यूचा आकडा वाढत असल्याने घाटावर अंतिम संस्कारासाठी मृतकांच्या नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रमुख घाटावर दिवसाला ४० ते ५० अंतिम संस्कार होत असल्याने घाटावरील यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

शवदाहिनी असूनही लाकडाचा वापर

पाच प्रमुख घाटावर शवदाहिनीची व्यवस्था आहे. परंतु एका शवदाहिनीत ६ ते १० अंतिम संस्कार केले जातात. परंतु या घाटावर प्रत्येकी ४० ते ५० अंतिम संस्कार केले जात आहेत. एका मृतदेहावर अंमिम संस्कार केल्यानंतर राख काढण्यासाठी शवदाहिनी थंड होण्याला वेळ लागतो. लगेच दुसऱ्यावर अंतिम संस्कार करता येत आहेत. यामुळे शवदाहिनी असूनही लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागत आहे.

सहा महिन्यांचा साठा दोन महिन्यांत संपला

मनपाच्या दहन घाटावर शवदाहिनी व मोक्षकाष्ठ असले तरी लाकडाचाही वापर केला जातो. वर्षाला ७ ते ८ हजार टन लाकडाचा वापर केला जातो. परंतु मृतकांची संख्या वाढल्याने सहा महिन्यांचा साठा दोन महिन्यांत संपत आल्याची माहिती घाटावरील कर्मचाऱ्यांनी दिली.