नागपूर – फडणवीस सरकारच्या कार्यकाळात राज्यात ५० कोटी वृक्षारोपणाचे महाअभियान राबवण्यात आले. मात्र, अभियानावर ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनीच शंका उपस्थित केल्याने वृक्षारोपणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, महाआघाडी सरकारनेही राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून त्याला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव दिले जाणार आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना ही माहिती दिली.
वन विभागाच्या प्रधान सचिवांना ५ वर्षांतील वृक्ष लागवडीची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात मंत्री राठोड म्हणाले की, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी आपल्याला चौकशीची मागणी करणारी पत्रे दिली आहेत. त्यामुळे आपण हा निर्णय घेतला आहे. प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिले असून याच आठवड्यात प्रधान सचिव नागपूरला येऊन यासाठी बैठकही घेणार आहेत. कोणी किती वृक्ष लावले? त्यापैकी किती वृक्ष जगले? याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून नेमक्या वृक्षारोपणाची माहिती काढावी लागणार आहे. या चौकशीला किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून मार्चअखेर किंवा एप्रिलपर्यंत त्याचा अहवाल येईल, असेही वनमंत्री राठोड म्हणाले.
लिम्का बुकने घेतली होती दखल
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचे महाअभियान फडणवीस सरकारने राबवले होते. त्याची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली होती. मात्र, पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांनी या वृक्षलागवडीवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता वनमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याने नवा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
नाईक यांच्या जन्मदिनीच अभियानाला सुरुवात
महाविकास आघाडी सरकार राज्यात ‘वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजने’ अंतर्गत ५० कोटी वृक्षारोपण करणार आहे. दरवर्षी १० कोटी वृक्षांचे रोपण केले जाईल. १ जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनीच वृक्षारोपणाच्या अभियानाला सुरुवात होईल, असे वनमंत्री राठोड यांनी सांगितले.