डेल्टा प्लस : कोरोनाच्या नव्या विषाणुंसंबंधी ३ राज्यांना केंद्राकडून सतर्काच्या सूचना; महाराष्ट्राचा समावेश

नवी दिल्ली  : करोनाच्या दुसऱ्या लाट ओसरू लागली असताना ‘डेल्टा प्लस’ या करोनाच्या नव्या प्रकाराने धोका निर्माण झालेला आहे. ६० टक्के वेगाने हा डेल्टा प्लस संक्रमित होत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवून सतर्क केलं आहे.

डेल्टा प्लस या नव्या प्रकाराचे बाधित रुग्ण कमी असले तरी, त्याची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील तीन राज्यांना तातडीने पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांचा समावेश आहे.

डेल्टा प्लस या तीनही राज्यांमध्ये कोरोनाच्या व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले आहेत. त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्राने या राज्यांना डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध आणि नियोजनात्मक पाऊलं उचलण्याचे आदेश दिलेले आहेत.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार करोनाचा डेल्टा व्हेरिएंट भारतासह जगातल्या एकूण ८० देशांमध्ये सापडला आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापरर्यंत एकूण ९ देशांमध्ये आढळला आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे.

डेल्टा प्लसचे भारतात एकूण २२ रुग्ण सापडले आहेत. या २२ पैकी १६ रुग्ण महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळले आहेत. त्याशिवाय काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळले आहेत.

डेल्टा प्लस विषयी आढावा घेणाऱ्या आयएनएसएसीओजी (Indian SARS-CoV-2 Genomic Consortia) या गटाच्या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डेल्टा प्लस प्रकाराविषयी महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

करोनाचा डेल्टा प्लस प्रकार महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव, केरळमधील पलक्कड आणि पथ्थनमथित्ता, मध्य प्रदेशमधील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यांमध्येआढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तीनही राज्यांना सल्ला दिला आहे की, स्थानिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाने या प्रकाराविषयी अधिक लक्षपूर्वक आणि कार्यक्षमपणे काम करणं आवश्यक आहे. आधीपासूनच या यंत्रणा व्यापक अर्थाने त्या पातळीवर काम करत असल्या, तरी डेल्टा प्लसबाबत अधित सतर्क राहण्याची गरज आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केली आहे.