नागपूर : गेल्या काही वर्षांपासून उपराजधानीतील गुन्हेगारीचा आलेख खाली येत असून यंदा गंभीर गुन्ह्य़ांमध्ये ८९८ ने घट झाली आहे. विशेष म्हणजे खून, बलात्कार, सोनसाखळी पळवणे आणि विनयभंग यासारख्या संवेदनशील गुन्हेही कमी झाले आहेत, असा दावा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम उपस्थित होते.
२०१७ च्या तुलनेत यंदा गुन्ह्य़ांमध्ये कमालीची घट झाली आहे. २०१८ मध्ये शहरात ७२ खून झाले असून ७१ गुन्ह्य़ांत आरोपींना अटक झाली. गेल्यावर्षीपेक्षा ही संख्या १३ ने कमी आहे. दरोडय़ाचा प्रयत्न, सोनसाखळी पळवण्याचे ४१, जबरी चोरी ३९, घरफोडी १३४, खंडणी मागण्यांच्या गुन्ह्य़ात ६ ने घट झाली आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये ८ ने, विनयभंगाच्या घटनांमध्ये १०, हुंडाबळी १० व हुंडय़ासाठी छळ होण्याच्या घटना ८४ ने कमी झाल्या आहेत. २०१८ मध्ये एकूण ८ हजार ५८४ गुन्ह्य़ांची नोंद झाली असून २०१७ च्या तुलनेत ८९८ ने कमी आहे. २०१७ मध्ये ९ हजार ४८२ गंभीर गुन्ह्य़ांची नोंद झाली होती. नागपूर पोलिसांची कामगिरी उंचावत असून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचा विश्वास डॉ. उपाध्याय यांनी व्यक्त केला.
काही खुनांच्या घटनांमधील आरोपी हे हद्दपार असताना शहरात शिरल्याचे दिसून आले. हद्दपार गुन्हेगारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी पोलीस ठाण्यांची असून त्यांनी शहरात प्रवेश केल्यानंतर पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. हद्दपारांनी शहरात प्रवेश केला असता त्यांना पकडून न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात येते. त्यामुळे हद्दपारी या प्रतिबंधात्मक कारवाईतील शिक्षा कठोर करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
अधिक वाचा : सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच महिला प्रत्येक क्षेत्रात : महापौर नंदा जिचकार