भारतात कोरोनाग्रस्तांना दिलं जाणार ‘हे’ औषध; शरीरात व्हायरसचं संक्रमण रोखणार

शरीरात व्हायरसचं रेप्लिकेशन (VIRUS REPLICATION) रोखण्याची क्षमता या औषधात आहे.

Corona Kit

नवी दिल्ली, 19 जून : भारतातील कोरोना रुग्णांवर हायड्रोक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिवीर या औषधांचं ट्रायल सुरू आहे. तर आता फेवीपिरवीर (Favipiravir) औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरलं जाणार आहे. भारतातील कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणं पाहता काही अटींनुसार ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI) या औषधाचा कोविड-19 च्या उपचारासाठी वापर करण्यास मंजुरी दिली आहे.

आपात्कालीन परिस्थितीतच या औषधाचा वापर केला जाईल आणि त्यासाठीदेखील रुग्णाच्या नातेवाईकांची परवानगी घेणं बंधनकारक असेल, असं डीसीजीआयने स्पष्ट केलं आहे.

हे औषध 14 दिवस दिलं जावं. सुरुवातीला 1 हजार रुग्णांवर या औषधाचे काय परिणाम होतात ते तपासले जावेत, असं ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने सांगितलं आहे. दरम्यान हे औषध उत्पादित करणारी ग्लेनमार्क कंपनी भारतात 10 प्रमुख सरकारी आणि खासगी रुग्णालयातील 150 रुग्णांवर फेविपिरवीर औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याच्या तयारीत आहेत.

काय आहे फेविपिरवीर औषध?

हे अँटिव्हायरल औषध आहे. चीन आणि जपानसारख्या पूर्व आशियाई देशांमध्ये इन्फ्लूएंझा रुग्णांना आधीपासून हे अँटिव्हायरल औषध दिलं जातं. इतर व्हायरल आजारांवर उपचारासाठीदेखील या औषधाचा वापर केला जातो. एका अभ्यासानुसार कोरोना संक्रमणातही हे औषध फायदेशीर ठरू शकतं, असं दिसून आलं.

चीनमध्ये कोरोना रुग्णांना प्रायोगिक तत्वावर हे औषध देण्यात आलं. इतर औषधांच्या तुलनेत हे औषध व्हायरल झपाट्याने कमी करतं असं दिसून आलं. रुग्णांचं सीटी स्कॅन करण्यात आलं, त्यात चांगली सुधारणा दिसून आली. मात्र काही रुग्णांमध्ये या औषधाचे साइड इफेक्टसही दिसून आले.

जगभरात कोरोनाव्हायरसचे 86 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. 4 लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे. भारतात सध्या कोरोनाचे 3,80,532 रुग्ण आहेत. 1 लाख 63 हजार 248 सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी रुग्णांचा आकडा हा 2 लाख 04 हजार 711 झाला आहे. सक्रीय रुग्ण आणि निरोगी रुग्ण यांच्यातील फरक दिवसेंदिवस वाढत आहे की भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. सध्या यांच्यात तब्बल 41 हजार 462चा फरक आहे. तर आतापर्यंत 12 हजार 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Also Read- Rs 50,000 crore, 116 districts, 6 states: PM Modi launches mega Garib Kalyan Rojgar Abhiyaan