सोनी सब वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. कार्यक्रमातील दयाबेन लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी स्वतः हा खुलासा केला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ च्या प्रेक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेले कित्येक दिवस प्रेक्षक दयाबेनला पाहण्यासाठी आतुर झाले होते. चाहते सोशल मीडियावर निर्माते आणि दिग्दर्शकांकडे वारंवार दयाबेनबद्दल विचारणा करत होते. आता चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी मोठा खुलासा करत दयाबेन मालिकेत परतणार असल्याची घोषणा केली आहे. अभिनेत्री दिशा वकानी गेली अनेक वर्ष मालिकेतून गायब आहे. परंतु, ती लवकरच मालिकेत परतणार आहेत.
दिशाने तीन वर्षांपूर्वी बाळंतपणासाठी मालिकेतून रजा घेतली होती. परंतु, इतकी वर्ष उलटूनही ती मालिकेत परत आली नव्हती. त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक वारंवार दिशाबद्दल विचारणा करत होते. महत्वाचं म्हणजे इतकी वर्ष दिशा मालिकेत न परतूनही निर्मात्यांनी तिच्या जागी इतर कोणत्याही अभिनेत्रीची नेमणूक केली नाही. आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या निर्मात्यांनी घोषणा करत दिशा परत येणार असल्याची बातमी दिली आहे. कार्यक्रमाच्या एका भागामध्ये निर्माते असित मोदी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की, सगळेच दयाबेनची वाट पाहत आहेत. त्यामुळे करोना महामारीचा धोका टळल्यानंतर दयाबेनचं मालिकेत आगमन होणार आहे.
दिशाने अभिनयाने मालिकेत तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या अभिनयाने तिने चाहत्यांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे तिच्या जागी दुसऱ्या कुणा अभिनेत्रीला पाहणं चाहत्यांना पसंत पडणार नव्हतं. त्यासोबतच दुसरी अभिनेत्री दिशाच्या भूमिकेला तिच्या इतकच उत्कृष्ट रीतीने साकारू शकेल का, अशीही शंका निर्मात्यांच्या मनात होती. परंतु, आता दिशा परत येणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. प्रेक्षक तिला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.