Covid19 Nagpur आता घराबाहेर पडताच मास्क लावणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने तर ती गरज झाली आहे. यामुळे लिपस्टिक लावून उपयोग काय, असे अनेक महिलांचे मत आहे.
Nagpur : कोरोना लॉकडाऊनच्या या दिवसांत शिक्षण क्षेत्रासोबतच लिपस्टिक इंडस्ट्रीवर मोठा परिणाम पडला आहे. लॉकडाऊन काळात आणि त्यापूर्वीच्या अनलॉक काळातही मास्कने या व्यापाराला जबरदस्त हादरा दिला आहे. रोज लिपस्टिकचा उपयोग करणाऱ्या महिला आणि युवती आता मास्कमुळे लिपस्टिक वापरू शकत नाहीत. जर लावलीच, तर मास्कमुळे ती दिसत नाही आणि ओठाच्या सभोवती पसरण्याची शक्यता अधिक असते. यामुळे या काळात लिपस्टिकचा वापर बराच घटला आहे.
आता घराबाहेर पडताच मास्क लावणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने तर ती गरज झाली आहे. यामुळे लिपस्टिक लावून उपयोग काय, असे अनेक महिलांचे मत आहे. यासंदर्भात कॉस्मेटिक व्यापारी आणि महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
महिलांमध्ये वापर घटला
लिपस्टिक ही ओठांचे आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्याची वस्तू आहे. गृहिणी असो की बाहेर काम करणाऱ्या महिला, लिपस्टिकचा वापर कायम असतो. वर्किंग वूमन लिपस्टिकचा रोज वापर करतात. मात्र, कोरोनाकाळात मास्क वापरला जात असल्याने लिपस्टिक लावणे थांबले आहे किंवा अत्यंत मर्यादित झाले आहे. यामुळे या व्यापारात ४० टक्के घट झाली आहे. फक्त कौटुंबिक कार्यक्रमापुरताच वापर मर्यादित झाला आहे. इतवारीमध्ये कॉस्मेटिक्सचा व्यापार मोठ्या प्रमाणात असायचा. हा व्यवसाय करणाऱ्या अंकित लचुलिया म्हणाल्या, एकाएकी व्यापार घटल्याने लहान व्यापाऱ्यांवर संकट ओढावले आहे. अन्य वस्तूंची विक्रीही घटली आहे.
कॉस्मेटिक व्यापार थांबला
गांधीबागमध्ये लहान स्वरूपात कॉस्मेटिक दुकान चालविणारे सतीश दाऊरे म्हणाले, कॉस्मेटिक साहित्याच्या विक्रीवर यामुळे ग्रहण आले आहे. लाखों रुपयांचा माल खरेदी करूनही एक हजार रुपयांपर्यंतही मालाची विक्री होत नाही. डिसेंबरनंतर बाजार जवळपास २० टक्के रुळावर आला होता. मात्र, आता पुन्हा तो थांबला आहे.
मास्क होतात खराब
सेजल धोटे म्हणाल्या, बाहेर जायचे असले की, मास्क लावूनच जावे लागते. जवळच्या नातेवाइकांकडे गेले तर मास्क लावून जावे लागते. पण, यामुळे मास्क खराब होतो. लिपस्टिकही निघून जाते. चेहरा खराब होतो. यामुळे आता वापर थांबविला आहे.
लिपस्टिकची खरेदीच नाही
नियमित लिपस्टिकचा वापर करणाऱ्या महिलांच्या मते, बाहेर कामानिमित्त पडणाऱ्या महिलांना मास्क लावावाच लागतो. यामुळे अनेक महिलांनी तर खरेदीच केली नाही. कॉस्मेटिकची खरेदी मर्यादित झाली असून, लिपस्टिकची मागणीही घटली आहे.